There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
सायबर गुन्हेगारांचा नवा डाव: डिजिटल अरेस्ट फसवणूक समजून घ्या !
एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला अचानक एक फोन आला. पलीकडून बोलणारी व्यक्ती कस्टम्स (सीमा शुल्क) विभागाची अधिकारी असल्याचे सांगत होती आणि आवाजावरून मोठ्या पदावरील व्यक्ती वाटत होती. "सर, तुमच्या नावाने परदेशातून पाठवलेले एक पार्सल अडकले आहे. त्यात ड्रग्ज आणि काही बनावट पासपोर्ट सापडले आहेत. तुमचे नाव आणि आधार कार्ड नंबर त्यावर आहे," अधिकारी म्हणाला.
हे ऐकून त्या अधिकाऱ्याचे पायच थरथरू लागले! आयुष्यात कधीही कायद्याचे उल्लंघन न केलेल्या या प्रतिष्ठित व्यक्तीला मनी लाँड्रिंग आणि ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अडकवले जात होते. त्यांच्या मनात भीती आणि गोंधळाचे एक मोठे वादळ उठले. पलीकडील कस्टम अधिकाऱ्याने त्यांची भिती ओळखून समजावणीच्या स्वरूपात सांगितले की हल्ली सायबर फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तुमच्यासारख्या निष्पाप लोकांचे नाव उगाचच यात अडकते. पण आम्हाला कायदेशीर कारवाई तर करावी लागणारच. त्यासाठी तुम्ही सहाय्य केले तर तुमच्यासाठीच चांगले होईल.
त्यानंतर लगेच, 'सुरक्षिततेच्या कारणास्तव' त्यांना एका व्हिडिओ कॉलवर येण्यास सांगण्यात आले. कॉलवर एक 'पोलिसांच्या गणवेशातील दुसरा अधिकारी' तयार होता. हा 'अधिकारी' त्यांना म्हणाला, "सर, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही कागदपत्रांची पूर्तता करत आहोत. लवकरच तुम्हाला अटक करण्यात येईल. आणि तोपर्यंत तुम्ही आता **'डिजिटल अटके'**त आहात. आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला लगेच एका शांत खोलीत जायचे आहे, फोन एअरप्लेन मोडवर ठेवायचा आहे आणि कोणाशीही बोलायचे नाही!"
कायद्याचा आदर करणाऱ्या या व्यक्तीने लगेच त्या अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकले. त्यांना भीती वाटत होती—सामाजिक बदनामीची, कुटुंबाला काय सांगायचे याची आणि आयुष्यात कमावलेल्या प्रतिष्ठेचे काय होणार याची. त्या पोलिसाने हेही सांगितले की तुमचे सर्व अकाउंट्स फ्रीझ करण्यात येत आहेत. सर्व अकाउंट्सचे डिटेल्स द्या. सर्व अकाउंट्स मधील पैसे एकत्र एका ठिकाणी ट्रान्स्फर करून मग ते कस्टम्सच्या अकाउंट्स मध्ये ट्रान्स्फर करा. २ आठवड्यानंतर चौकशी पूर्ण होईल तेव्हा पैसे परत करण्यात येतील. तुम्ही निर्दोष आहात तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. दोन आठवड्यांचाच तर प्रश्न आहे.
पुढील काही तासांत त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील मोठी रक्कम फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली. दोन आठवडे उलटून गेले तरी पैसे परत आले नाहीत. फसवणूक झाली हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता.
मित्रांनो, ही कथा एका व्यक्तीची नाही, तर आज देशभरातील हजारो सुशिक्षित नागरिकांची आहे, जे या नव्या सायबर जाळ्यात अडकत आहेत. भारतामध्ये डिजिटल अरेस्ट फ्रॉडचे प्रमाण वाढत आहे. दररोज सायबर क्राइम पोर्टलवर साधारण ७,००० तक्रारी नोंद होतात. २०२४ मध्ये भारतीयांनी डिजिटल अरेस्ट फ्रॉडमध्ये १,६१६ कोटी रुपयांचे नुकसान सोसले.
डिजिटल अटक म्हणजे नक्की काय?
'डिजिटल अटक' ही सायबर गुन्हेगारांनी सुरू केलेली एक ऑनलाइन फसवणूक आहे.
तुमच्या मनात भीती निर्माण करून, तुम्हाला पूर्णपणे एकटे पाडून, एका बनावट अटकेच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे उकळणे, म्हणजे डिजिटल अटक. यात, अटक प्रत्यक्षात झालेली नसते; ती केवळ व्हिडिओ कॉलवर भासवलेली असते.
या फसवणुकीचे बळी कोण ठरत आहेत?
तुम्हाला वाटत असेल की या जाळ्यात फक्त कमी शिकलेले किंवा कमी माहिती असलेले लोकच अडकतात, पण आकडेवारी आणि घटना पूर्णपणे वेगळे चित्र दाखवतात.
उदाहरणार्थ, ऑगस्ट २०२४ मध्ये, एका वर्धमान टेक्स्टाईल कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना S.P. OSWAL यांना याच पद्धतीने फसविण्यात आले. मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्याचे सांगत त्यांना बनावट डिजिटल अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून तब्बल ७ कोटी रुपये उकळण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांनी चक्क बनावट ऑनलाईन कोर्ट उभे करून त्यांना घाबरवले.
दुसरे उदाहरण – डिसेंबर २ ० २ ४ मध्ये कॅनडाहून आलेल्या दोन अनिवासी भारतीय (NRI) भगिनींना लखनऊमध्ये मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून फसवले गेले आणि त्यांच्याकडून २ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले गेले.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
या घटना सांगतात की, शिक्षण, सामाजिक स्थान किंवा वय या गोष्टींचा या फसवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. कारण, फसवणूक करणारे तुमच्या भावनांचा आणि बुद्धीचा ताबा घेतात.
फसवणूक करणारे तुमच्या भावनांचा ताबा कसा घेतात?
यामागे एक सोपे मानसशास्त्र (Psychology) काम करते. सायबर गुन्हेगार खूप हुशारीने काम करतात:
भीती हेच हत्यार : ड्रग्ज, टेररिझम किंवा चाइल्ड पॉर्नोग्राफीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे नाव ऐकल्यावर व्यक्ती घाबरते आणि तिची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Rational Thinking) तात्काळ थांबते.
सामाजिक बदनामीची भीती: बरेचदा, आरोपांमध्ये लैंगिक गैरवर्तन किंवा बाल-अश्लीलतेच्या (POCSO) मुद्द्यांचा समावेश केला जातो. यामुळे व्यक्तीला वाटते की ही माहिती कुटुंबाला किंवा समाजाला कळाली तर बदनामी होईल. या सामाजिक बदनामीच्या भीतीने ती व्यक्ती शांत राहते आणि फसवणूक करणाऱ्यांच्या सूचना पाळते.
एकटेपणाचा फायदा: तुम्हाला 'डिजिटल अटकेत' ठेवले जाते, म्हणजे कुटुंबीय किंवा मित्रांशी बोलण्यास मनाई केली जाते. जेव्हा तुम्ही एकटे पडता, तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या खोट्या 'मदतीची' गरज वाटते.
तातडीची मागणी: "आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करा, नाहीतर मी तुम्हाला खरंच अटक करेन!" अशा धमक्या देऊन ते तुम्हाला विचार करायला वेळच देत नाहीत. तुमचा मेंदू तातडीने 'संकटातून बाहेर पडण्याचा' मार्ग शोधतो आणि ते सांगतात त्या सूचनांचे पालन करतो.
डिजिटल अटकेच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला कसे वाचवाल?
या फसवणुकीचे काही निश्चित धोक्याचे इशारे (Red Flags) आहेत, जे तुम्ही ओळखलेच पाहिजेत:
धोक्याचा इशारा (Red Flag) - "कोणाशीही बोलू नका!"
जर तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांशी, मित्रांशी किंवा वकिलांशी बोलण्यास मनाई केली जात असेल, तर तो १००% घोटाळा आहे. तुमच्याकडे वकिलाची मदत घेण्याचा अधिकार आहे.
धोक्याचा इशारा (Red Flag) - व्हिडिओ कॉलवर अटक
कोणतीही खरी पोलीस किंवा सरकारी एजन्सी व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही. अटकेची कायदेशीर प्रक्रिया प्रत्यक्ष जागेवर केली जाते.
धोक्याचा इशारा (Red Flag) - 'गुप्त' खात्यात पैसे ट्रान्सफर करणे
कोणताही अधिकारी किंवा बँक तुम्हाला 'गुप्त' (Secret) किंवा 'सुरक्षितता ठेव' म्हणून वैयक्तिक खात्यात पैसे ट्रान्सफर करायला सांगत नाही.
धोक्याचा इशारा (Red Flag) - तातडीची किंवा धमकीची भाषा
जर तुम्हाला लगेच पैसे दिले नाहीत तर 'गंभीर परिणाम' होतील अशा धमक्या देत असतील, तर कॉल लगेच कट करा.
सर्वात महत्त्वाची खबरदारी:
सत्यता तपासा: तुम्हाला ज्या अधिकाऱ्याचा फोन आला आहे, त्याच्या विभागाच्या अधिकृत कार्यालयात फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून त्या अधिकाऱ्याचे नाव आणि क्रमांक तपासा.
माहिती उघड करू नका: तुमचा OTP (One Time Password), बँक तपशील किंवा गोपनीय वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला कधीही देऊ नका.
फोन रेकॉर्ड करा: कोणतीही माहिती देण्याआधी फोन रेकॉर्ड करा. जरादेखील शंका आली तरी संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करा.
फसवणूक झाल्यास काय कराल?
तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या फसवणुकीला बळी पडल्यास, वेळ वाया घालवू नका. फसवणूक झाल्यावर लगेच तक्रार करणे महत्त्वाचे असते, कारण यामुळे गेलेले पैसे पोलिसांना थांबवता (Freezing) येतात.
राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन: 1930 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधा.
ऑनलाईन तक्रार: भारत सरकारच्या www.cybercrime.gov.in या पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवा.
लक्षात ठेवा, कोणतीही फसवणूक तुमच्या माहितीशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, सावध रहा आणि सुरक्षित रहा!
तुम्ही कधी अशा फसवणुकीला बळी पडला आहात का? किंवा तुमच्या मित्रमंडळीत अशी घटना घडली आहे का ? कमेंट करून नक्की सांगा! त्यामुळे इतरांना याबाबतीत जागरूक करता येईल.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !