प्रतिक्रिया देऊ नका. प्रतिसाद द्या.

पूर्वी मी ज्या कंपनीत काम करायचो तिथे माझा एक मित्र होता विवेक नावाचा. त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे होते. पण ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीवर किंवा कॅंटीनमध्ये नेहमी भेटायचा त्यामुळे मैत्री झाली होती.
विवेक हा एक साधा, पण हुशार व्यक्ती होता. थोडासा अबोल , काटेकोरपणे वेळ पाळणारा, आणि कामात पूर्णपणे झोकून देणारा माणूस. एका प्रोजेक्टसाठी त्याने महिनाभर जीव तोडून मेहनत केली होती. शनिवार-रविवारही काम करायचा. त्याने एवढं काम केलं होतं की सगळ्यांना खात्री होती की, हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट समोर सादर करायला विवेकचीच निवड होईल. कारण त्याने सर्वाधिक कष्ट घेतले होते.
पण बैठकीच्या दिवशी, त्याचा सीनियर समीरने प्रेझेन्टेशन केलं आणि सगळं क्रेडिट स्वतःच्या नावावर केलं.
विवेक तिथे बसून फक्त पाहत राहिला.
एक शब्दही न बोलता, फक्त पाहत राहिला.
त्या संध्याकाळी नेहमीच्या वेळी चहा प्यायलाही आला नाही. फोन केला आणि बळेच बाहेर घेऊन गेलो . त्याचं मन त्या कॉन्फरन्स रूममध्येच अडकलेलं. “मी एवढे कष्ट केले , आणि त्याने श्रेय लुटलं. असा चोर आणि कृतघ्न माणूस मी कधी पाहिलाच नाही.” विवेक रागारागात पुढचे पाच मिनिटे फक्त त्याच्या सिनिअरला शिव्या देत होता .
मला गॉडफादर मधल्या मायकेल कोर्लीओनचा डायलॉग आठवला आणि मी बोलून गेलो “Never hate your enemies. It affects your judgment.”
विवेक क्षणभर थबकला. मी त्याला म्हंटल माझ्यावर पण रागावणार नसशील तर तुला थेट सांगतो .“तू समीरवर रागावला आहेस , की स्वतःवरच ? तू रागावला आहेस कारण तू गप्प बसलास? तू रागावला आहेस कारण समीरने प्रेझेन्टेशन इतकं चांगलं केलं की त्यालाच क्रेडिट मिळालं ? तू replacable आहेस आणि तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस म्हणून तुला राग येतोय !


राग म्हणजे काय?
राग म्हणजे फक्त ओरडणं, भांडणं किंवा शिव्या देणं नाही. कधी-कधी तो आत साठलेला, न बोलता आलेलं दुखावलेपण असतो, असहाय्य्यता असते. हा राग तुमच्या निर्णयांवर परिणाम करतो .
तुमच्या डोळ्यासमोर रागाचं चित्र कसं असतं ? लालबुंद चेहरा, थरथरणारी बोटं, काहीतरी फेकून देणं? पण खरा राग इतका नाट्यमय नसतो. तो शांत असतो. गप्प. आत साचलेला. बाहेर हसत बोलताना, आतमधून विचारांची आग पेटलेली असते. “तो मला असं बोलला … मी हे कधीही विसरणार नाही.”
आणि या साठलेल्या रागाचं सर्वात मोठं नुकसान कुठे होतं?
तुमच्या निर्णयक्षमतेवर !
मायकेल कोर्लीओनचं वाक्य सांगतं, की जेव्हा तुम्ही कोणावर राग धरता, तेव्हा तो राग तुमच्या डोक्यावर बसतो—त्याच्या नव्हे.
“तुम्ही शत्रूला शिक्षा देत नाही, तुम्ही स्वतःला गोंधळात टाकता.”
रागाच्या भरात प्रत्येक गोष्ट त्या चष्म्यातूनच दिसते. प्रत्येक सल्ला संशयास्पद वाटतो. प्रत्येक पर्यायात धोका जाणवतो. “तो पुन्हा फसवेल का?” “मी मवाळपणा दाखवला, तर लोक मला कमजोर समजतील का?” “मी त्याच्यासारखं वागलो, तर त्याचं नुकसान होईल का?”
हे प्रश्न स्वाभाविक वाटतात. पण त्यामागे भीती असते. आणि राग हे त्या भीतीचं कवच असतं.
राग तुमचा फोकस हरवतो.
कल्पना करा, तुम्ही एखादी मोठी डील साइन करणार आहात. पण समोर बसलेली व्यक्ती तीच आहे, जिने याआधी तुमच्यावर टीका केली होती. तुम्ही आतून तापलेले आहात, पण बाहेरून शांत दिसायचं आहे. मग काय होतं? तुमचं लक्ष डीलवर कमी आणि त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेवर जास्त केंद्रित होतं. तिने geniunly एखादी जरी शंका विचारली तरी मुद्दामहून मला त्रास देण्यासाठीच विचारत आहे असं वाटू लागतं .


मग रागाचं करायचं काय?
खरं आहे, आपण कितीही समजूतदार असलो, तरी काही गोष्टी मनाला खूप लागतात . कोणी आपल्या मागे बोललं, मित्राने श्रेय चोरलं, ऑफिसात तुमची आयडिया दुसऱ्याच्या नावावर गेली, किंवा अगदी छोटी गोष्ट—ट्रॅफिकमध्ये कोणी कट मारून गेलं. तरी राग अनावर होतो.
यावर आपण काय करायचं?
“रिअ‍ॅक्ट” न करता “रिस्पॉन्ड” करायला शिकायचं .
“त्याने बोललं, म्हणून मी बोललो” — ही आहे प्रतिक्रिया.
पण “त्याने बोललं… तरी मी थांबून काय बोलणार ते आधी ठरवतो” — हा आहे प्रतिसाद.
लगेच उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ घ्या. दोन खोल श्वास घ्या. स्वतःला विचारा, “माझा खरा उद्देश काय आहे?” तुमचं उत्तर एकदम वेगळं असेल.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

एक मिनिट थांबायला शिका
हा साधा, पण जबरदस्त उपाय आहे.
पुढच्या वेळी कोणी तुमच्या राग येईल असं काही करेल, तेव्हा जरा थांबा. घड्याळात एक मिनिट पाहा. काहीच बोलू नका. ना प्रतिक्रिया, ना प्रतिसाद.
त्या एका मिनिटात तुमचे भावनिक तापमान काही अंशांनी खाली येईल. आणि बऱ्याचदा, तुमचं उत्तर आपोआप सौम्य होईल.


रागाचं प्रेरणेत रूपांतर करा
रागाला संधी म्हणून पाहा.
“हा राग का येतोय? कोणती मूल्यं दुखावली गेली?”
उदाहरण: कोणी तुमचं काम चोरलं—म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.
कोणी तुमचा वेळ वाया घालवला—म्हणजे तुम्ही वेळेची किंमत जाणता.
मग रागाची दिशा बदला. त्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी काम करा.
राग सतत मनात ठेवून चालत नाही. पण त्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं घडवता येतं.
तुमचं “मोठं ध्येय” लक्षात ठेवा
क्लायंट डील गमावली. तुमच्याशी कुणी चुकीचं वागलं. कोणी अपशब्द वापरले.
पण प्रत्युत्तर देताना आठवा, “माझं खरं ध्येय काय आहे?”
दोन मिनिटांचा वादविवाद जिंकणं? की पाच वर्षांचं उद्दिष्ट शांतपणे गाठणं?
रागाचं उत्तर तात्काळ मिळतं. पण शांततेचं उत्तर पुढे नेते.
आता विचार करा—
तुम्ही राग धरलात, तरी पुढच्या वेळी तो माणूस तसाच वागेल का?
की तुम्ही तुमचं उत्तर बदललंत, तर पुढचा अनुभवच वेगळा असेल?
राग ही फक्त एक भावना आहे. ती टाळता येत नाही. पण त्याला कसं उत्तर द्यायचं, हे शिकता येतं.
आपण बऱ्याचदा समजतो, की शांत राहणं म्हणजे कमजोरी. “तो काहीही बोलला, आणि मी गप्प राहिलो? लोक काय म्हणतील?”
पण खरं सांगायचं, तर शांत राहणं ही एक निवड आहे. एक न बोलता व्यक्त होणारी ताकद. जी ओरडण्यापेक्षा खोल आवाज निर्माण करते.
रागाला उत्तर न देणं म्हणजे हार मानणं नाही. तो म्हणजे, “मी तुझ्या वागण्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण माझी ओळख माझ्या कृतीवरून ठरेल.”
हे पटण्यासाठी एक उदाहरण देतो . महाराष्ट्रात दोन नेत्यांचे पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आले . एक नेता संधी मिळेल तेव्हा प्रतारणा करणाऱ्यासंबंधी राग व्यक्त करत असतो . दुसरा नेता प्रतारणा करणाऱ्या विरोधी एक वाक्यही रागाने बोलला नाही.
तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का, जिथे तुम्ही रागात निर्णय घेतला आणि नंतर पश्चात्ताप झाला?
किंवा उलट—तुम्ही संयम ठेवला आणि काही दिवसांनी कळलं, “मी रागात उत्तर दिलं असतं, तर सगळं बिघडलं असतं…”
आपण अशा क्षणांतून शिकतो. आणि हळूहळू हे लक्षात येतं—शांत राहिल्याने तुम्ही निर्णय घेता. रागाने वागलात, तर निर्णय तुमच्यासाठी घेतले जातात.
मायकेल कोर्लीओनचं वाक्य नीट लक्षात ठेवा -
“Never hate your enemies. It affects your judgment.”
हा फक्त माफिया चित्रपटातला डायलॉग नाही. हे एक जीवनाचं तत्त्व आहे—जिथे संघर्ष आहे, तिथे रागाऐवजी विचारशील शांततेला स्थान द्यायचं.
कारण शेवटी, शत्रूने कितीही त्रास दिला तरी , तुमची निर्णयक्षमता जर सुस्पष्ट राहिली, तर तुम्ही कधीच हरत नाही.
पुढच्या वेळी…
कोणी अपमान करत असेल…
कोणी धमकी देत असेल…
कोणी फसवत असेल…
तेव्हा फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा:
“मी त्याच्या वागण्याप्रमाणे वागणार, की माझ्या मूल्यांनुसार?”
तुमचं उत्तर त्या क्षणी ठरेल. पण तुमचं वर्तन तुमचं भविष्य घडवेल.
हे वाचताना तुम्हाला एखादा प्रसंग आठवला का?
आजच ठरवा—पुढच्या अशा प्रसंगात तुम्ही “रिअ‍ॅक्ट” करणार की “रिस्पॉन्ड” करणार?
शत्रूचं वागणं कधीच आपल्या हातात नसतं. पण त्याला दिलेला प्रतिसाद—तीच आपली खरी ताकद असते !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !