इट दॅट फ्रॉग 

#Saturday_Bookclub

एखादा दिवस असा येतो, ज्या दिवशी सगळंच वेळेचं गणित चुकतं... आणि काही माणसांच्या बाबतीत असा दिवस एखादाच नसतो, तर त्यांच्या बाबतीत असं रोजच घडत असतं. सकाळी आधी उठायला उशीर, मग आवरायला उशीर, मग कामावर वेळेवर पोचायला उशीर आणि असं करत करत रोजची महत्त्वाची कामंही या लोकांची कधीच वेळेवर पूर्ण होत नाहीत. किंबहुना काही काही माणसं तर कितीही महत्त्वाची कामं समोर असली तरीही ती उद्यावर ढकलत आजचा दिवस काढतात.

याउलट काही माणसांच्या पाठीमागे सदैव भरपूर कामं लागलेलीच असतात.. आणि दिवसभर कितीही कामं केली तरीही त्यांच्या कामाच्या यादीत नेहमी काही ना काही कामं शिल्लकच असतात.. एकंदरीत काय, राब राब राबूनही यांची कामं कधी पूर्णच होत नाहीत.

अशा या दोन्हीही प्रकारच्या लोकांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे वेळेच्या व्यवस्थापनाचा.. !
कारण, जर वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलंत तर कधीच अशा अडचणी तुम्हाला येणार नाहीत. आपल्या सगळ्यांनाच आपली कामं पूर्ण करण्यासाठी समान वेळ असतो. दिवस आणि रात्र मिळून 24 तासांच्या अवधीतच आपल्याला आपली कामं पूर्ण करायची असतात, पण काही काही माणसांना हे वेळेचं गणित इतकं उत्तम जमतं, की ते आपल्या कामांचा फडशा पाडण्यात यशस्वी होतात. ते इतके प्रॉडक्टीव्ह असतात की त्यांचं हे कसब पाहून अनेकांना त्यांच्याविषयी कुतूहल वाटू लागतं.
पण अनेकांना दिवसाचे चोवीस तासही कमीच पडतात आणि त्यांची कामं नेहमी अपूर्ण रहातात.
अशा लोकांपैकी जर तुम्हीही एक असाल, तर आज आम्ही ज्या पुस्तकाविषयी तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही वाचायलाच हवं.

या पुस्तकाचं नाव आहे ईट दॅट फ्रॉग ..
या पुस्तकाचे लेखक ब्रायन ट्रेसी हे स्वतः अत्यंत प्रभावी असे वक्ते, बेस्ट सेलर लेखक आणि जगप्रसिद्ध मॅनेजमेंट गुरू आहेत. या पुस्तकात त्यांनी वेळेचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिलेली आहे.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

लेखकाने वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापन करण्याच्या काही सोप्या सोप्या पद्धती या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. पुस्तकाच्या नावातला फ्रॉग म्हणजे ते महत्त्वाचं कामं जे तुम्हाला पूर्ण करायलाच हवंय..
इट दॅट फ्रॉग म्हणजे तो बेडूक खा असा शब्दशः अर्थ नसून लेखक आपलं लक्षं त्या महत्त्वाच्या कामाकडे वेधू इच्छितो जे तुम्ही खरंतर दिवसाच्या सुरुवातीलाच हातावेगळं करायला हवंय. आपल्या सगळ्यांसमोरच दर दिवशी असं किमान एक आणि जास्तीत जास्त तीन अशी सर्वात महत्त्वाची आणि तातडीने पूर्ण करायची कामं असतात जी आपण पूर्ण न केल्यास आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच, या तिन्ही कामांचाही आधी प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे व त्यानुरूप ती कामं एकामागोमाग एक करत पूर्ण करायला पाहिजेत.

आता अर्थातच तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा तेच तर कळत नाही ना .. ! तर त्याचीही पद्धत लेखकाने पुस्तकात दिलेली आहे -
आपल्यासमोरील कामांचे A, B, C, D, E अशा पाच कॅटेगरीत वर्गीकरण करायचे.
✔️ A म्हणजे अत्यंत महत्त्वाची आणि तातडीने करायची कामं
✔️ B म्हणजे महत्त्वाची कामं
✔️ C म्हणजे महत्त्वाची नसली तरीही केलेली चांगली अशी कामं
✔️ D म्हणजे इतरांना देता येतील अशी कामं
✔️ E म्हणजे केली नाहीत तरीही चालतील अशी कामं
आणि यांपैकी ए कॅटेगरीतही फक्त तीनच कामं यावीत आणि त्यांचा देखील ए1, ए2 आणि ए3 असा प्राधान्यक्रम ठरवता यायला हवा. हे ए कॅटेगरीमधलं काम म्हणजेच लेखक सांगत असलेला बेडूक .. आणि हा बेडूक आधी खाऊन संपवा.. मग बघा तुमची उत्पादनक्षमता (प्रॉडक्टिव्हीटी) कशी जोरदार वाढते.

लक्षात ठेवा, कामाचं नियोजन करण्यातला 1 मिनीट आपले पुढचे कितीतरी तास वाया जाण्याशिवाय वाचवू शकतो.

( या पुस्तकाची मराठी आवृत्ती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/EatThatFrog )


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com