Explore - Exploit Method

जगात शिकण्यासारखं खूप काही आहे. जगात करण्यासारखं खूप काही आहे. आणि इथेच आपलं कन्फ्युजन सुरू होतं की मी नक्की काय शिकावं, मी नक्की काय करावं. मी कोणत्या क्षेत्रात जाऊ? मी कोणत्या बिजनेस आयडिया ला पुढे घेऊन जाऊ? मी कोणतं नवीन स्किल शिकू? हा प्रश्न आपल्याला सतत सतावत असतो. आज या लेखामध्ये याचे उत्तर शोधू या.

मित्रांनो, एक गोष्ट सुरुवातीलाच मान्य करूया की आपण सर्व काही शिकू शकत नाही. आपण सर्वच क्षेत्रात बिजनेस किंवा करिअर करू शकत नाही. आपल्याकडे असलेला वेळ मर्यादित आहे, कमी आहे आणि म्हणून योग्य क्षेत्र निवडणे आणि तेही लवकरात लवकर निवडणे खूप महत्त्वाचे आहे.

मायकल फेल्प्स हा जगप्रसिद्ध स्विमर. उसेन बोल्ट हा जगप्रसिद्ध धावपटू. या दोघांनी आपापली क्षेत्र लवकर निवडली हा त्यांच्या यशातला एक प्रमुख, परंतु न दिसणारा असा भाग आहे. मायकल फेल्प्स ने काही वर्षे स्विमिंग करून नंतर धावपटू बनायचं ठरवलं असतं, किंवा उसेन बोल्टने काही वर्षे धावून नंतर स्विमर बनायचं ठरवलं असतं तर ते जगातील नंबर वन प्लेयर बनले असते का?

म्हणूनच मित्रांनो, आपण जास्तीत जास्त लवकर आपलं कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे. आणि आणि एकदा ते निवडल्यानंतर जोपर्यंत त्यामध्ये मास्टरी मिळत नाही तोपर्यंत त्याला चिकटून राहिलं पाहिजे. आणि हेच आहे यशाचं गमक.

यासाठी आपण Explore - exploit तंत्र वापरु शकतो. एक्सप्लोर म्हणजे नवीन नवीन संधी शोधणे. करिअरच्या सुरुवातीला, किंवा व्यवसाय करायचा असेल तर सुरुवातीला आपण जास्तीत जास्त संधी एक्सप्लोर केल्या पाहिजेत. त्यापैकी कोणत्या भविष्यासाठी उपयोगी ठरतील आणि मुख्य म्हणजे तुम्हाला करण्यासारख्या वाटतील अशा संधी यामध्ये शोधल्या पाहिजेत. आपला जोडीदार निवडण्याचा आधी आपण डेटिंग करतो, खरेदी करण्याआधी अनेक दुकानं पालथी घालतो, टीव्हीवर काय बघायचे हे ठरवण्यासाठी अनेक चॅनल्स फिरून येतो..... हे सर्व एक्सप्लोर करणेच आहे. पण, शिक्षणाच्या बाबतीत असं करतो का? कोणीतरी सांगतं की इंजिनिअरिंग कर, मेडिकल कर, एमपीएससी कर ... आणि आपण त्या मार्गाला लागतो. नोकरीच्या बाबतीतही असंच आहे. जी पहिल्यांदा मिळेल सहसा ती नोकरीच स्वीकारून पुढे जातो. असं न करता, सुरुवातीच्या काळात जास्तीत जास्त एक्सप्लोअर करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी पालकांनी मुलांना दोन- तीन वर्षे देणे आणि स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणं फार महत्वाचं आहे.
===================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
===================
Explore ची दुसरी बाजू म्हणजे अति- एक्सप्लोर करणे. अनेक जण सतत नवीन काही ना काही शोधत असतात. आणि मग आपण याला, " एक ना धड भाराभर चिंध्या" असं म्हणतो. म्हणून एक्सप्लोर करत असताना, स्वतःला ठराविक वेळ द्या. साधारणपणे सुरुवातीची दोन वर्ष एक्सप्लोर करण्यासाठी द्या. एक्सप्लोर करत असताना काही गोष्टी आपल्याला जमतील, काही गोष्टी जमणार नाहीत. काही गोष्टी मध्ये आपण यशस्वी होऊ, काही गोष्टींमध्ये होणार नाही. ज्यामध्ये यशस्वी होतोय, त्याच गोष्टींना पुढे Exploit करायचं आहे. एक्सप्लॉइट म्हणजे, पुरेपूर फायदा घेणे. जी संधी आपण निवडली आहे, त्यामध्ये खोलात जाऊन काम करणे, expert होणे याला म्हणतात exploit करणे.

सुरुवातीच्या काळात 80 टक्के explore आणि 20 टक्के Exploit. आणि एकदा संधी ठरवली ती त्यानंतर 80% Exploit आणि 20 टक्के Explore हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता तुम्ही विचाराल, Exploit करत असताना पुन्हा 20% Explore का करायचं? त्याचं कारण असं, की जी संधी आपण Exploit करत आहोत, ती लुप्त तर होत नाहीये ना? त्याची बाजारातील किंमत कमी तर होत नाहीये ना.... हे पाहून त्यानुसार पुढील मार्ग ठरविण्यासाठी 20 टक्के वेळ Explore करण्यासाठी दिला पाहिजे.

मग आता लक्षात आलं मित्रांनो. कोणत्या बिझनेस आयडिया वर काम करू, हे कोणालाही विचारत बसू नका. स्वतः काही संधी explore करून बघा. जी जमेल, ती exploit करा. कोणत्या क्षेत्रांमध्ये शिक्षण घेऊ, हे कोणालाही विचारत बसू नका. स्वतः काही संधी explore करून बघा. जी जमेल, ती exploit करा.
आपले पूर्वज म्हणजे आदिमानव ही भटकी जमात होती. खाण्याच्या शोधासाठी ते सतत फिरत असायचे म्हणजे Explore करत असायचे, आणि काही काळानंतर शेती करायला लागले म्हणजेच हातात असलेली जमीन, आसपास असलेले पाणी, वातावरण आणि आपलं ज्ञान वापरून Exploit करायला लागले. तेव्हा आधुनिक मानव झाले.

मी स्वतः जेव्हा बिझनेस सुरु केला, तेव्हा ऑनलाइन काहीतरी करायचं हे डोक्यात पक्कं होतं. पण ऑनलाईन मध्ये काय हे कळत नव्हतं. म्हणून मी ब्लोगिंग, वेब डिझाईनिंग, लोगो डिझाईनिंग, ई-कॉमर्स, यूट्यूब चैनल, व्हिडिओ एडिटिंग सर्विस, डिजिटल मार्केटिंग आणि ई लर्निंग या ऑनलाईन क्षेत्रांना Explore केलं होतं. त्यापैकी, यूट्यूब चैनल, डिजिटल मार्केटिंग आणि ई लर्निंग.... या संधी मी निवडल्या. आणि शेवटी त्यापैकी फक्त ई लर्निंग हे एकच संधी Exploit करायचं ठरवलं, आणि गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीपणे करत आहे.

मला खात्री आहे मित्रांनो, या लेखातून यापुढे आपण काय करायचं हे ठरवण्याचा उत्तम मार्ग Explore - Exploit तुम्हाला मिळाला असेल !

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया !
www.netbhet.com