There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सोन्याचे भाव भरमसाठ वाढतायत. एक लाखावर गेलं तेव्हाच डोक्यावरून पाणी गेलं ..आता तर १ लाख २ ० हजार झालं आहे. अशा वेळी बहुतांश लोकांना आपल्या आजीने किंवा आईने सोन्यात गुंतवणूक कर असे सांगितलेले आठवले असेल.
तुम्ही नव्या पिढीतील गुंतवणूकदार असाल तर Equity सोन्यापेक्षा चांगली गुंतवणूक कशी आहे हे सांगून त्यांचा सल्ला कदाचित धुडकावून दिला असेल. त्यांचा सल्ला ऐकला असता तर ? आधीच सोन्यामध्ये गुंतवणूक केली असती तर ? याचा तुम्हाला आता खेद वाटतोय का ?
गेल्या 10 वर्षांचे आकडे पहा
सेन्सेक्सचा 10 वर्षांचा वार्षिक CAGR — सुमारे 12%
सोन्याचा 10 वर्षांचा CAGR — सुमारे 15.4%
म्हणजेच, 1 लाख रुपये जर शेअर बाजारात गुंतवले असते तर ते 3.16 लाख झाले असते, आणि तेच सोन्यात गुंतवले असते तर 4.18 लाख झाले असते.
आकडेवारी तर स्पष्ट सांगतेय की सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर आहे. पण थांबा — या आकड्यांच्या मागे एक गोष्ट आहे. या वाढीतील बहुतांश फायदा गेल्या दोन वर्षांत झाला आहे. त्याचं कारण म्हणजे जगभरातील भूराजकीय तणाव (geopolitical turmoil) — अमेरिका, चीन, रशिया, युक्रेन इत्यादी घडामोडींमुळे जगात अनिश्चितता वाढली, आणि लोकांनी पुन्हा सुरक्षित ठिकाण म्हणून सोन्याकडे धाव घेतली.
दीर्घकालीन पाहिलं तर, मागील 30 वर्षांत सोन्याचा CAGR साधारण 10% इतकाच आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
जर जागतिक तणाव कमी झाला, तर सोन्याचे भाव पुन्हा घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतिहास सांगतो की सोन्याचेही चढ-उतार आहेत. 1996 नंतर सलग 6 वर्षे सोन्याचा भाव घसरला होता. “कुठलीच गुंतवणूक किंवा उत्पादन कायम टिकणारं नसतं. परिस्थिती बदलते, बाजार बदलतो, कंपन्या बदलतात, तंत्रज्ञान बदलतं.”
त्यामुळे वेळीच सोन्यात गुंतवणूक न केल्याचं दुःख करण्यात काहीच अर्थ नाही.
भूराजकीय परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल याची पूर्वकल्पना कुणालाही नव्हती. पण भूराजकीय परिस्थिती कधीही बदलू शकते ही शक्यता मात्र आपल्या सर्वानाच पूर्वीपासून आहे. हा धोका ओळखून यावर उपाय करणे हेच आपल्या हातात आहे.
भविष्य कुणीच सांगू शकत नाही.
आज सोनं वर गेलंय, उद्या ते खाली येऊ शकतं.
म्हणूनच “सगळी गुंतवणूक सोन्यातच करा” किंवा “सगळी शेअर्समध्येच करा” — ही दोन्ही टोकाची धोरणं धोकादायक आहेत.
गुंतवणुकीतला खरा शहाणपणा म्हणजे — - Asset Allocation
म्हणजेच, आपली संपत्ती विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये (asset classes) विभागणे —
इक्विटी (शेअर्स) , डेट (बॉण्ड, FD), रिअल अॅसेट्स (सोनं, मालमत्ता इ.)
Asset Allocation हे एकदाच करण्याची गोष्ट नव्हे. त्यामध्ये पोर्टफोलिओ रीबॅलन्स करणेही तितकेच महत्वाचे असते.
उदाहरणार्थ — समजा तुम्ही ठरवलं की तुमच्या एकूण संपत्तीपैकी 10% गुंतवणूक सोन्यात असेल. आणि सोन्याच्या किमती वाढल्यावर जर ती 20% पर्यंत गेली, तर थोडं सोनं विकून पुन्हा 10% वर या.
हेच “रिबॅलन्सिंग” — म्हणजे बाजाराच्या चढउतारांवर ताबा ठेवण्याचं शहाणपण.
जग आज अनिश्चिततेने भरलेलं आहे — युद्ध, तंत्रज्ञान, हवामान, राजकारण.
अशा काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे — संतुलन आणि शिस्त. हीच कायम टिकणारी गुंतवणूक आहे.
“सोनं चमकतं, पण शहाणपण टिकतं.”
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !