चांगली इच्छा, अविचारलेले परिणाम: प्लास्टिक ते कॉटनची कहाणी

चांगली इच्छा, अविचारलेले परिणाम: प्लास्टिक ते कॉटनची कहाणी

स्टेन गुस्टाफ़ थुलिन हा स्वीडन मधील एक संशोधक होता.

१९५९ मध्ये त्याने एक शोध लावला - प्लास्टिक बॅगचा !

कारण तेव्हा होणारा कागदी पिशव्यांचा भरमसाठ वापर. त्याकाळी सर्वत्र कागदी पिशव्याच वापरल्या जात. हा कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत होती. स्टेनला पर्यावरणाची काळजी होती. म्हणून त्याने कागदी पिशव्यांसाठी पर्याय शोधला. आणि त्यातून शोध लागला प्लॅस्टिक पिशव्यांचा.

प्लास्टिक पिशव्या सोयीस्कर होत्या. त्यामुळे त्यांची मागणी आपोआप वाढू लागली. त्यानंतर केवळ २ ० वर्षांत संपूर्ण युरोपात ८० % प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या जाऊ लागल्या.

हळूहळू हा शोध जगभर पसरला आणि आता प्लास्टिकच्या पिशव्यांचा भरमसाठ वापर होतो आहे. हे प्लॅस्टिक नष्ट व्हायला हजारो वर्षे लागतात, या प्लास्टिकचे समुद्राच्या तळांशी भव्य डोंगर उभे राहिले आहेत आणि लाखो समुद्री प्राणी प्लॅस्टिकमध्ये अडकून किंवा गुदमरून मरण पावतात.

जो शोध पर्यावरणाच्या बचावासाठी होता तोच शोध आता पर्यावरणाची प्रचंड हानी करत आहे.

गेल्या दशकात यावर उपाय म्हणून अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या बॅन त्याच्याएवजी करून कापडी पिशव्यांचा वापर सुरु करण्यात आला. आता वापरणाऱ्याला वाटते की मी कापडी पिशवी वापरून पर्यावरणाचे रक्षण करण्यास हातभार लावतोय.

पण २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार कापसाच्या पिशव्यांच्या उत्पादनामुळे मुख्यत्वे पाण्याची मोठी गरज आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते.

यामध्ये पाण्याच्या स्रोतांचा ऱ्हास होतो, मातीची गुणवत्ता खालावते आणि जलप्रदूषण तसेच हवामान बदलास कारणीभूत ठरणारे वायू उत्सर्जन होते. ओझोनचा थर नष्ट होण्यात देखील कापडी पिशव्यांच्या प्रॉडक्शनचा हात आहे.

जर खरंच कापडी पिशवीचा पर्यावरण रक्षणासाठी उपयोग व्हायचा असेल तर प्रत्येक पिशवीचा तब्बल 7100 वेळा पुनर्वापर होणे आवश्यक आहे.

यावर उपाय म्हणून लोक ऑरगॅनिक कॉटन पासून बनलेल्या पिशव्यांकडे वळले. पण प्रत्यक्षात ऑरगॅनिक कॉटन त्याहून जास्त हानिकारक ठरत आहे. ऑरगॅनिक कॉटनचे उत्पन्न कमी (कमी यील्ड) असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज दुपटीने जास्त असते.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी

https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

आणि हे सगळे कमी म्हणून की काय या प्रश्नामध्ये आणखी गुंतागुंत वाढते ती माणसाच्या दुटप्पी स्वभावाची ! आम्ही पर्यावरणाची काळजी करतो म्हणून छान छान कापडी बॅग खरेदी करणारे, त्या अभिमानाने मिरवणारे लोक प्रत्यक्षात आपली बॅग खराब होऊ नये म्हणून दैनंदिन खरेदीच्या वेळी प्लास्टिक पिशव्यांच वापरतात. (ग्रीनवॉशिंग) म्हणजे प्लॅस्टिकही आणि कॉटनही ...पर्यावरणाला दुहेरी धक्का !

तशीच गत गाड्यांच्या बाबतीत झाली आहे. सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या घोडागाड्यांकमुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात घोड्यांची लीद पसरलेली असायची. त्यामुळे दुर्गंधी, आजार पसरणे असे प्रश्न उभे राहिले होते. पुढे तेलावर चालणाऱ्या इंजिनाच्या गाड्या आल्या आणि हा प्रश्न सुटला.

पण तेलावर चालणाऱ्या गाड्यांचा वापर वाढला आणि हवेतील प्रदूषण, जमिनीतील मर्यादित तेलसंपत्तीचा अमर्यादित उपसा असे नवे प्रश्न तयार झाले. यावर उपाय म्हणून आता इलेक्ट्रिक वाहनांकडे पहिले जाते आहे.

पर्यावरण प्रेमी इलेक्ट्रिक गाड्यांकडे झुकत आहेत कारण इलेक्ट्रिक गाडीतून निघणारा धूर दिसत नाही. पण प्रत्यक्षात बॅटरी साठी लागणारी खनिजे लिथियम/कोबाल्ट

शोधण्यासाठी कित्येक खाणी दिवसरात्र जमिनीच्या पोटात खोलवर शिरत आहेत. बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारी वीज तयार करण्यासाठी खित्येक टन कोळसा जाळला जात आहे. हे मात्र आपल्याला दिसत नाही. कितीतरी गोष्टी नजरेआड होतात म्हणून त्या घडतच नाही असे वाटते.

हा प्रवास एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो: आपली चांगली ‘इच्छा’ (Intention) नेहमीच ‘उत्तम परिणामा’त (Result) रूपांतरित होतेच असे नाही.

जीवनात आपण अनेक निर्णय घेतो, अगदी पिशवी निवडण्यापासून ते करिअर निवडण्यापर्यंत. प्रत्येक वेळी आपली इच्छा काहीतरी चांगले करण्याची, परिस्थिती सुधारण्याची किंवा कोणतीही समस्या सोडवण्याची असते. थुलिन यांना पर्यावरणाची काळजी होती; कापडी पिशवी वापरणाऱ्यांनाही तेच वाटते आणि इलेक्ट्रिक गाडी घेणाऱ्यांनाही!

पण, केवळ चांगली इच्छा बाळगणे पुरेसे नाही; त्या इच्छेच्या संपूर्ण आणि दूरगामी ‘परिणामांचे’ कठोर विश्लेषण करण्याची आणि त्यांची जबाबदारी देखील आपलीच आहे.

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

What would you like to learn today?