There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
शुक्रवार सकाळ.
झेन्ट्राटेक सोल्यूशन्सच्या सातव्या मजल्यावर नेहमीपेक्षा जास्त गडबड होती.
आज परफॉर्मन्स रीव्ह्यू होता.
रोहित — सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर. गेली तीन वर्षं तोच या टीमचा आधारस्तंभ होता.
“टीम टिकलीय कारण मी आहे.” असं त्याचं ठाम मत होतं .
पण आज तो थोडासा अस्वस्थ होता.
कारण त्याच्या टीममधली ज्युनियर सदस्य — स्नेहा — क्लायंटने थेट मेल करून तिचं कौतुक केलं होतं.रोहितला आणि त्याच्या बॉसेसला CC केली होती.
पण मेलमध्ये रोहितचं नाव नव्हतं. एकट्या स्नेहाचंच कौतुक होतं. अवघड निर्णय एकहाती घेऊन वेळेवर प्रोजेक्ट पूर्ण केल्याबद्दल स्नेहाचे आभार मानण्यासाठी क्लाएंटने ईमेल पाठवला होता.
रोहित मनातच म्हणाला, “एक प्रोजेक्ट हाताळला म्हणून काय ती आता स्टार झाली?”
थोड्याच वेळात स्नेहा त्याच्या केबिनमध्ये आली.
“गुड मॉर्निंग, सर.”
“मॉर्निंग,” रोहितचा स्वर थंड होता.
स्नेहाचा रिव्ह्यू चालू झाला.
“स्नेहा, तुझं काम पाहिलं. ठीक आहे. पण तू थोडी हद्द ओलांडतेस. सीनियरशी कन्सल्ट न करता थेट निर्णय घेतेस.”
स्नेहाचं हसू अचानक विरलं.
“सर, क्लायंटचं डेडलाइन होतं... सगळे दुसऱ्या कामात होते म्हणून...”
रोहितने स्नेहाला मध्येच थांबवलं — “कंपनीत काम फक्त डेडलाइनवर नाही होत, सिस्टिमवर होतं. ही गोष्ट जेवढ्या लवकर शिकशील तेवढं बरं.”
ती काही न बोलता बाहेर पडली.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq
येथे क्लिक करा.
================
रोहितला समाधान वाटलं — “ऑथॉरिटी दाखवली पाहिजे.”
पण त्यानंतर दिवसभरात काहीतरी बदल जाणवू लागला.
कॅफेटेरिया मध्ये तो शिरताच गप्पा अचानक बंद झाल्या.
HR ने नेहमीप्रमाणे हसून अभिवादन करण्याऐवजी केवळ मान हलवली.
फायनान्समधला त्याचा मित्र म्हणाला, “थोडं रिलॅक्स हो, हल्ली तू खूप रागात असतोस !”
त्याच दिवशी संध्याकाळी रोहितचा रिव्यू होता. त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये रोहित गेला. रिव्यू सुरु होताच बॉस म्हणाला -
“रोहित यु आर टेक्निकली साऊंड, पण लीडरशिपमध्ये कमी पडतोयस.”
“टीमचं कौतुक करत नाही.”
“तुझ्यासोबत काम करताना इतरांना प्रेशर जाणवतं.”
प्रत्येक वाक्य त्याला आतून टोचत होतं.
सकाळी स्नेहा जशी केबिन मधून बाहेर पडली तसाच तोही निराश होऊन बाहेर पडला.
स्नेहाने चुगली केल्याचा त्याला राग आला.
काही क्षण शांत बसला. मग हळूहळू जाणवलं —
ही स्नेहाची चूक नाही.
ही इतर कोणाचीही चूक नाही.
ही त्याची स्वतःची चूक आहे.
कधी एकेकाळी तो ज्यांच्यावर रागवायचा, तशा बॉसेस सारखाच तो स्वतः झाला होता — गर्विष्ठ, असुरक्षित आणि ‘स्वतः’ मध्ये अडकलेला.
त्याने त्याच्या करिअर मध्ये स्वतः पुढाकार घेऊन अनेक कठीण प्रोजेक्ट्स पूर्ण केले होते आणि त्यासाठी क्लाएंट कडून अशा अनेक ईमेल्स त्याला आल्या होत्या त्याची आठवण झाली. तशा कामामुळेच तर त्याचे प्रमोशन होत होते. तसेच काम आज स्नेहाने केले तर त्याला राग येण्याचे कारण नव्हते.
संध्याकाळी ऑफिसची लाईट्स बंद झाल्या, काचेत त्याचं प्रतिबिंब दिसलं — थकलेलं, पण काहीतरी नवीन शिकलेलं.
तो हलकेच हसला आणि पुटपुटला —
“बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय ।
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ।।”
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !