काम करताना लक्षकेंद्रीत कसे करावे?

एकाग्रता हा एक शब्द आपल्याला हमखास यश मिळवून देऊ शकतो. आपल्या सर्वांकडे सारखेच आठवड्याचे सात दिवस असतात, दिवसाला २४ तास असतात. खुप काम करणारी माणंसच यशस्वी होतात असं नाही तर, असे लोक यशस्वी होतात जे त्यांच्या कामाच्या कमीत कमी वेळात जस्तीत जास्त लक्षकेंद्रीत करुन काम करतात.

जर तुम्हाला चांगले मार्क हवे असतील किंवा खुप पैसा हवा असेल तर तुम्हाला तुमच्या कामात लक्षकेंद्रीत राहता आलं पाहीजे. त्यामुळे लक्षकेंद्रीत कसे करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे पण त्याआधी लक्षकेंद्रीत करणे म्हणजे काय हे समजून घेऊया. लक्षकेंद्रीत करणे म्हणजे एकाच गोष्टीवर आपले सगळे लक्ष लावणे. अन्य सर्व लक्ष भरकटवणार्‍या गोष्टींपासून दूर राहून एकाच कामाला आपले सर्व लक्ष पुरवणे. पण जेव्हा तुम्ही हे करत असता तेव्हा लक्ष विचलीत करणार्‍या खुप गोष्टी तुमच्यासमोर येतील.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात दु:ख आहेत. असुरक्षितता, कामाचा ताण, भविष्याची चिंता याला सर्वजण सामोरे जात असतात. आपली दु:ख आणि भीती या लक्षकेंद्रीत करण्याच्या प्रक्रियेतील मुख्य शत्रू आहेत. जर तुम्हाला कुठेही लक्षकेंद्रीत करता येत असेल मग ते शाळेच्या ठिकाणी असो वा कामाच्या ठिकाणी तर तुम्ही तुमची ध्येयं नक्कीच मिळवू शकता आणि तुमच्यामध्ये कार्यक्षमता सुध्दा निरंतर राहते, तेच जर तुम्हाला शांत ठिकाणी बसून सुध्दा लक्षकेंद्रीत करता येत नसेल तर तुम्ही तुमची ठरवलेली ध्येये पूर्ण करु शकणार नाही. तुम्हाला तुम्ही आत जिथे आहात तिथेच न राहता पुढे जायचे असेल तर तुम्हाला लक्षकेंद्रीत करता आलेच पाहीजे.

आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की लक्ष विचलित करणार्‍या या वातावरणामध्ये कामावर लक्षकेंद्रीत कसे करावे. आज जशा वातावरणामध्ये आपण आहोत तिथे अनेक गोष्टींना आपले लक्ष हवे आहे. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी आपले लक्ष त्यांच्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमची फोकस करण्याची क्षमताच तुम्ही किती लांबचा पल्ला गाठू शकता हे ठरवणार आहे.


१. लक्ष विचतिल करणार्‍या गोष्टींकडे दूर्लक्ष करुन लक्षकेंद्रीत कसे करावे.

तुमची एकाग्रता तोडण्यासाठी विचलित करणार्‍या, मोहात पाडणार्‍या गोष्टी सर्वप्रकारे आडव्या येतील. जेव्हा तुम्हाला एकचित्ताने काम करायचे असेल तेव्हा अशा सर्व गोष्टी ज्या तुमचे लक्ष खेचू शकतात त्या सर्व गोष्टी दूर ठेवल्या पाहीजेत. विचतिल करणार्‍या या गोष्टी फक्त बाहेरच नाहीत तर तुमच्या मनात सुध्दा असतात. भीती, शंका, चिंता या गोष्टी सुध्दा तुमच्या ध्येयपूर्तीमध्ये अडथळा ठरतात. सर्वप्रथम अशा गोष्टींची यादी करा. आणि जाणिवपुर्वक त्यांना टाळा. बाहेरील गोष्टींप्रमाणेच तुमच्या या विचारांपासून सिध्दा दूर रहण्याचा सराव करा.

२. काम करताना त्याचा आनंद घ्या.

असे मार्ग शोधा जे तुमचे ध्येय पूर्ण करण्याची प्रक्रिया आनंदी बनवतील. काहीवेळा फक्त समोरचा देखावा बदलल्यामुळे सुध्दा तुम्हाला काम करताना आनंद मिळतो. अन्य वेळेला तुम्हाला तुमच्या कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे. जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडते काम करता जसे जेवण बनवणे, वाचन करणे, नृत्य करणे किंवा मग तुमचा कोणता तरी छंद तेव्हा तुम्हाला एकाग्रता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. बरोबर? पण तेच जर न आवडणार्‍या कामामध्ये तुम्ही लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला तर छोटीशी टाचणी सुध्दा तुमचे लक्ष विचलित करु शकते.

३. तुमच्या मनामध्ये भावनिक संघर्षांना थारा देऊ नका.

मना मध्ये चालत असलेला भावनिक संघर्ष लक्षकेंद्रीत न होण्यामागचा मोठा अडथळा आहे. मनात चालू असलेले भावनिक संघर्ष मनाची एकाग्रता पूर्णपणे नष्ट करतात आणि मग कामात लक्ष देणे कठीण होऊन बसते.जर तुमच्या मनात असं काही सुरु असेल ज्याचा तुम्हाला त्रास होतो आहे, तर कामाला लागायच्या अगोदर ते सोडवा. त्यामुळे मनात विचारांचं युध्द भडकू देऊ नका. या विचारांच्या युध्दाला सोडवायला जितका जास्त वेळ तुम्ही घ्याल ते लक्षकेंद्रीत करण्याच्या प्रक्रियेत तितकाच मोठा अडथळा बनत जाईल.

४. कामाचे नियोजन छोट्या छोट्या भागांमध्ये करा.

कल्पना करा की तुम्हाला एक संपूर्ण केक एका खाण्यासाठी दिला आहे. तो केक तुम्ही एका घासात खाऊ शकाल का? एक पूर्ण केक एकाच वेळी तोंडात घेताच येणार नाही, पण तेच जर तुम्ही केक चे छोटे छोटे तुकडे करुन खाल्ले तर संपूर्ण केक खाणे कठीण नाही. हेच आपल्या बाबतीत लागू पडते. कधीकधी, मोठ्या कामावर एकदात सर्व लक्षकेंद्रीत करायचा प्रयत्न निव्वळ मूर्खपणा ठरु शकतो. काम जेव्हा खुप मोठ असेल एका प्रयत्नात करणे अशक्य वाटत असेल तेव्हा त्या कामाचे छोटे छोटे भाग करा आणि एका वेळेला एका भागाकडे आपले लक्षकेंद्रीत करा तेच काम सोपे वाटेल ताण वाटणार नाही.

५. पूर्ण झोप घ्या.

तज्ञांच्या मते झोप तुमच्या एकाग्रतेच्या क्षमतेवर प्रभाव टाकू शकते. म्हणजेच ठराविक तास व्यवस्थित झोप घेतल्याने आपली एकाग्रतेची क्षमता वाढते. खुप कमी वेळ झोप घेणे किंवा खुप जास्त वेळ झोपणे लक्षकेंद्रीत करताना समस्या निर्माण करु शकते. दररोज व्यवस्थित झोप होण्यासाठी तुम्ही तुमचे झोपायचे तास एकादाच निश्चित करु शकता किंवा रोज झोपण्यासाठी एखादं निश्चित वेळापत्रक ठरवू शकता.

६. थोडा वेळ काढा.

काम करताना छोटे छोटे ब्रेक घेणे तुम्हाला कामात लक्षकेंद्रीत करण्यास मदत करु शकतात. जर तुम्ही तासभर काम करत असाल तर तुम्हाला ५ ते १० मिनिटाचा ब्रेक तुम्ही घेऊ शकता, आणि प्रत्येक अर्ध्या तसानंतर तुम्ही ३ ते ५ मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता. हे छोटे छोटे ब्रेक हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहीत करतील आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

हे छोटे ब्रेक तुमच्या डोळ्यांना आणि मनाला आराम देतील आणि त्यानंतर तुम्ही पहील्यापेक्षा जास्त कामावर लक्षकेंद्रीत करु शकाल. तुम्ही आठवणीसाठी घड्याळ किंवा मोबाईल मध्ये गजर लावू शकता. तुम्हाला एखाद्या वेळी ब्रेक घेण्याची गरज भासत नसेल तर तुम्ही तो ब्रेक वगळू शकता.

७. अनेक कामे एकाच वेळी करु नका.

एकाच वेळेला अनेक कामे करणे एकाग्रतेवर परिणामकारक ठरु शकते. सगळीकडे आपले लक्ष पुरवता पुरवता एकाच कामाकडे लक्षकेंद्रीत करण्याची आपली क्षमता कमकुवत होऊ शकते. एका वेळी अनेक कामे करण्यासाठी आपल्याला आपले लक्ष एका कामाकडून दूसर्‍या कामाकडे न्यावे लागते. जितके जास्त आपण आपले लक्ष एका कामाकडून दूसर्‍या कामाकडे बदलतो तितकी जास्त उर्जा आपल्याला लावावी लागते. त्यापेक्षा कामाला सुरुवात करण्याआधी तुम्ही दिवसभरात करायच्या कामाची यादी बनवून त्याप्रमाणे एक एक काम एकावेळी पूर्ण करु शकता त्यामुळे लक्षकेंद्रीत करण्याची क्षमता सुध्दा वाढेल.

८. सावध रहा.

सावध रहा म्हणजे क्षणाला क्षणाला आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत याची स्वतःला जाणीव करुन देत राहणे, जे लक्षकेंद्रीत करण्यासाठी मदत करेल. सावध राहून जेव्हा जेव्हा तुमचे लक्ष कामावरुन जायला लागेल तेव्हा तेव्हा स्वतःला आपण कुठे आहोत आणि काय करतो आहोत याची जाणीव करुन देण्याची सवय तुमची जात असलेली एकाग्रता जिथे हवी तिथे परत आणण्यास मदत करेल. तुम्ही एकाग्रतेच्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरुन मनाला प्रशिक्षित करु शकता.

९. क्रियेटिव्ह कामाला प्राधान्य द्या.

सामान्यतः आपण दिवसाची सुरवात सोप्या आणि विचार करायला न लागणार्‍या कामांनी करतो आणि नंतर कठीण कामे करायला घेतो. त्यामुळे या सुरवातीच्या कामांमध्येच आपण आपली उर्जा आणि एकाग्रतेची क्षमता कमी करतो. लक्षकेंद्रीत करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कामाचा क्रम बदलला पाहीजे. आपल्या दिवसाची सुरुवात अशा कामाने झाली पाहीजे जिथे क्रियेटीव्हीटी आणि जास्त एकाग्रतेची जास्त गरज आहे. त्या नंतर त्यापेक्षा कमी क्षमता लागणारी कामे करावी. यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाच्या कामामध्ये जास्त एकाग्र राहता येईल.

१०. तुम्ही काम का सुरु केले आहे ते लक्षात ठेवा.

जेव्हा तुम्ही एखादं काम सुरु करता तेव्हा त्या कामामागची तुमची कारणं तुमच्या मनात ताजी असतात. तुमच्यासाठी ती एकदम स्वच्छ असतात. थोडा वेळ गेल्या नंतर जेव्हा तुम्हाला समस्या जाणवू लागते आणि मनाबरोबर संघर्ष सुरु होतो तेव्हा तुम्ही हे काम का सुरु केल याची मनाला जाणीव करुन देत रहा. तोच तुमचा हेतू असतो, प्ररणा असते आणि तुम्ही आता जे काम करताय ते त्यामुळेच करत असता. या लक्षकेंद्रीत ठेवण्यास मदत होईल.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com