There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
आमच्याकडे एक फॅक्टरी हेड होते. स्वभावाने एकदम कडक. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक प्रकारची रूक्ष पणाची छटा असायची.
सर्व वर्कर्स आणि ज्युनियर स्टाफ त्यांना प्रचंड घाबरत असे. फॅक्टरी म्हणजे ते आणि ते म्हणजे फॅक्टरी असे एक समीकरण तयार झाले होते.
मी तरी त्यांना कधीही हसताना किंवा निवांतपणे रिलॅक्स बसलेले पाहिले नव्हते.
पुढे एका युरोपियन कंपनीसोबत कॉलेबोरेशन झाले. त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी आमच्या फॅक्टरीला भेट देणार होते. आणि काही टेक्निकल मिटिंग्ज पण होणार होत्या. तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता.
जेव्हा ती युरोपीय टीम आली तेव्हा कसे कुणास ठाउक पण आमच्या फॅक्टरी हेड चा स्वभाव अचानक बदलला. ते चक्क विनोद करत होते. प्रत्येकाची विचारपूस करत होते. सर्व फिरंग्यांसोबत casual गप्पा मारत होते.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
त्यांच्या स्वभावाची ही बाजू मला नव्यानेच कळली. शेवटी परदेशी पाहुणे गेल्यानंतर आमची एक अंतर्गत मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये आमचे फॅक्टरी हेड पुन्हा जैसे थे झाले होते. अतिशय कडक, रागीट आणि जेवढ्यास तेवढं बोलणारे...बिलकुल n हसणारे.
मला त्यांच्या या स्वभावाची गंमत वाटली. मॅनेजमेंटच्या भाषेत याला "कॉर्पोरेट मास्किंग" म्हणतात. ना त्यांचा स्वभाव रागीट होता ना सौम्य. तर ते त्यांचा स्वभाव व्यक्तिपरत्वे बदलत होते. व्यक्ती जर त्यांच्या नजरेत कमजोर असली तर ते रागीट वागत आणि व्यक्ती जर आपल्यापेक्षा वरचढ वाटली तर ते मनमिळावू स्वभावाचा मुखवटा धारण करत.
मुन्नाभाई चित्रपटामध्ये मध्ये एक सीन आहे ज्यात लग्नासाठी पहायला आलेला मुलगा वेटर सोबत कसा बोलतो त्यावरून तो कसा आहे हे ठरवण्याचा सल्ला मुन्नाभाई देतो. त्याच्यामागे हेच कारण आहे. आपण प्रत्येकजण असे मुखवटे धारण करत असतो. वरवर विनम्र, गोड वाटणारी व्यक्ती जेव्हा समोरचा माणूस आपलं काही बिघडवू शकत नाही हे कळल्यावर पूर्णपणे वेगळी वागते.
असे मुखवटे ओळखता आले पाहिजेत. दुर्दैवाने ते कळण्यासाठी आधी अनेक चुका किंवा वाईट अनुभव घ्यावे लागतात.
पण खरा स्वभाव कधीच मुखवट्याच्या मागे लपून राहत नाही. काही काळासाठी आपण तो लपवू शकतो, पण परिस्थिती, लोक आणि प्रसंग त्याला उघड करतातच. म्हणूनच आपल्या वागण्यात सातत्य असणं महत्त्वाचं. कोणाशीही — मोठ्याशी की छोट्याशी — समान आदराने, प्रामाणिकपणे वागणं हीच खरी व्यावसायिकता.
मुखवटे वापरून क्षणिक प्रभाव पाडता येतो, पण विश्वास आणि सन्मान कायम ठेवायचा असेल तर स्वतःचं खरेपणच सर्वात मोठं शस्त्र ठरतं..
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया.