लिज्जतकथा !

शिक्षण नाही,
अनुभव नाही,
भांडवल नाही,
मदत नाही,
समाजाचा सपोर्ट नाही....या परिस्थितीत भलेभले हात टेकतात. मात्र सात महिलांनी या परिस्थितीवर मात करून तब्बल 1600 करोडचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या जिद्दीची आणि अचाट बिझनेस कौशल्याची ही गोष्ट !

वर दिलेली कारणं तुमच्या पण प्रगतीच्या आड येत असतील तर ही गोष्ट वाचून तुम्हाला लक्षात येईल की ही फक्त "कारणे" आहेत , प्रश्न नाहीत.

तर .. ते वर्ष असेल साधारण 1950 चं.. जेव्हा भारतातील बहुतांश लोकांच्या पदरी शिक्षण नव्हतं. शिक्षणालाच मुळात तेव्हा तितकंस महत्त्व प्राप्त झालेलं नव्हतं, असा तो काळ. या काळात सात बायकांनी, ज्यांना मुळात उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा कोणताही अनुभव नव्हता ना पदरी शिक्षण होतं.. अशा बायकांनी एकत्र येऊन एक असा उद्योगव्यवसाय सुरू केला की जो बघता बघता प्रचंड वाढला. या व्यवसायाची उलाढाल अल्पावधीतच तब्बल 1600 कोटींइतकी झाली आणि तब्बल 69 शाखाही अस्तित्वात आल्या.
या विलक्षण उद्योगव्यवसायाचं नाव होतं, 'श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड !'

अलिकडच्या काळातील टॉपक्लास दोन कंपन्या 'स्टारबक्स' आणि 'Apple' यांच्या व्यावसायिक धोरणांशी मिळतीजुळती तत्व भारतातील लिज्जत पापड समूहानी त्याकाळीच राबवली होती.

काय होतं या कंपनीच्या धोरणांमध्ये एवढं विशेष की ज्यामुळे ही कंपनी अल्पावधीतच एवढी फोफावली आणि तब्बल 62 वर्षांहून अधिक काळ या कंपनीने जनमानसावर राज्य केलं ?
तत्कालीन भारताची स्थिती अशी होती की जेव्हा अगदी 8 टक्केच महिला शिकलेल्या होत्या. मात्र, शिकलेल्या असूनही त्यांनासुद्धा घराबाहेर पडून काम करण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीही, 1959 च्या सुमारास सात महिलांनी एकत्र येत अशी कल्पना प्रत्यक्षात आणली ज्यासाठी त्यांना कुठेच घराबाहेर न जाताही नफा कमावता येणार होता. शिवाय वेळेचं बंधन नव्हतं आणि हे उत्पादन तत्कालीन बाजारपेठेची गरजही होतं.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

सुरूवातीला मिळालेल्या अवघ्या 80 रूपयांच्या भांडवलातून काम सुरू झालं. मात्र एवढ्याशा भांडवलातूनही त्यांनी बनवलेले पापड इतके चविष्ट होते की अल्पावधीतच लहानमोठ्या दुकानदारांनी हे पापड आपल्याकडे विक्रीसाठी ठेवण्यास सुरूवात केली.

आता हळूहळू लिज्जत पापडने आपला व्यवसाय वाढवायला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी आपल्या उत्पादनांची किंमत थोडीफार वाढवली आणि आपल्याबरोबर आणखी काही महिलांना या कामी जोडून घेतले. त्यांच्या या कृतीने महिलांच्या जीवनात रंग भरले, अनेक महिलांना जगण्याचा नवा उद्देश सापडला, नवा दृष्टीकोन मिळाला.

या कंपनीच्या पहिल्या बोर्ड मीटींगमध्ये त्यांनी 'महिला सक्षमीकरण' हेच उद्दीष्ट ठरवून टाकले. महिलांचं जीवन फुलवणे व त्यांना स्वयंपूर्ण होता येण्यासाठी हा समूह योगदान देईल असे मोठे लक्ष्य आता या कंपनीने समोर ठेवले व त्यानुरूप काम सुरू केले. त्यासाठी कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातील काही रकमेची तरतूद सर्वानुमते करण्यात आली. लिज्जत समूहाशी जोडल्या जाणाऱ्या महिलांना 'कामगार' वगैरे न संबोधता छानपैकी 'लिज्जत सिस्टर्स' अर्थात 'लिज्जत भगिनी' असे संबोधून त्या प्रत्येकीला कंपनीच्या मालकीहक्कातील काही प्रमाणात भागधारक बनवण्यात आले. सामुहिक मालकी हक्क तत्वावर कंपनी अधिक जोमाने प्रगती करू लागली. नफा आणि तोटा सर्वांनी मिळून वाटून घ्यायचा हे साधं तत्व..

ना वयाची अट, ना धर्माची, ना जातीची ..
प्रत्येक महिला कंपनीची काही प्रमाणात मालकीण असणार हेच धोरण कायमस्वरूपी राबवले गेले. सध्या प्रचलित असलेल्या 'स्टारबक्स' कंपनीनेही हेच धोरण अंगिकारले आहे.. केवळ फरक एवढाच आहे की स्टारबक्समध्ये एमबीए पदवी घेतलेल्या सुशिक्षित हुशार पदाधिकाऱ्यांनी ही कल्पना राबवली आहे तर लिज्जत पापड समूहातील स्त्रिया अल्पशिक्षित व अशिक्षित असूनही त्यांनी हीच कल्पना कैक वर्षांपूर्वीच राबवली होती.. तेव्हा स्टारबक्सचा जन्मही झाला नव्हता. एवढी कुशाग्र बुद्धीमत्ता या महिलांची होती.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

लिज्जत समूहाच्या प्रगतीचा दुसरा व महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी सप्लाय चेन तयार केल्या. याकरिता कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या जीवनशैलीशी सुसंगत कामाचे स्वरूप व वेळा आणि किफायती आणि अत्यंत दर्जेदार उत्पादन बनवण्याचा त्यांचा प्रयास यशस्वी झाला.
एका विशिष्ट मध्यवर्ती ठिकाणी पापडाकरीता वापरण्यात येणारे पीठ एकत्रित केले जाई. तिथे त्या पिठापासून पापडाची खिशी (dough) बनवली जाई. लिज्जत भगिनी तेथून ती घेऊन जात आणि त्यापासून ठराविक आकाराचे व संख्येचे पापड बनवत. हे पापड कंपनीत आणून दिले की त्यांना त्याचे पैसे आणि पुढले पापड बनवण्यासाठी पुन्हा आणखी पापडाची खिशी दिली जाई. अशा पद्धतीने काम सुरू झाले आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत दिवसागणिक कंपनी मोठी होऊ लागली.

कंपनीला जो नफा होई, तो गोल्ड कॉईन्सच्या स्वरूपात महिलांमध्ये वाटून दिला जाई. या सर्वात फार महत्त्वाचं होतं ते म्हणजे कंपनीचे ध्येयधोरण कायम ठेवणे व सर्व महिलांना त्यामध्ये व त्यानुरूप प्रोत्साहन देत काम चालू रहाणे आणि कंपनीने हे देखील यशस्वी करून दाखवले.

"सर्वांसाठी प्रगतीची द्वारे खुली" या तत्वामुळे शेकडो महिला या समुहाशी देशभरातून जोडल्या गेल्या व त्यांनी आपली प्रगती व आपल्या मेहनतीने व्यवसायवृद्धीही केली.
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की केवळ एमबीए सारख्या मोठमोठ्या पदव्या असतील तरच तुमचा व्यवसाय यशस्वी होतो असे नाही, तर व्यवसाय यशस्वी होण्यासाठी एकात्मतेची ताकद ओळखता यायला हवी.

एका उद्योजकात म्हणूनच शिक्षणाबरोबरच, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि दूरदृष्टी व विकास करण्याची क्षमता या साऱ्यांचा उत्तम मिलाप असला पाहिजे.

Some people give REASONS , and some give RESULTS....! You are in which category ??

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com