रिश्ते’ — भिंतीवर लिहिलेला जाहिरातीचा धडा

रिश्ते’ — भिंतीवर लिहिलेला जाहिरातीचा धडा

भारतीय जाहिरात क्षेत्रातील "ध्रुवपद" ज्यांनी मिळवलेले असे पीयूष पांडे नुकताच निवर्तले. कायमच्या मनावर कोरल्या जातील अशा अनेक उत्तमोत्तम जाहिराती त्यांनी केल्या. एका मुलाखतीत त्यांनी पाहिलेली सर्वोत्तम जाहिरात कोणती असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यामध्ये पीयूषजींनी त्यांना आवडलेल्या आणि आठवणीत राहिलेल्या एका जाहिरातीचा किस्सा सांगितला होता.

ती त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतील गोष्ट होती. ती जाहिरात पाहूनच मी खऱ्या अर्थाने जाहिरात काय असते, हे शिकलो असे ते म्हंटले होते. तो किस्सा त्यांच्याच शब्दात -

======================

मी जयपूरचा. सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्लीला शिकायला जायचो तेव्हा प्रवासासाठी बस आणि ट्रेन हाच आधार होता. घरून जेवढे पैसे मिळायचे, त्यात लक्झरी सोडा, पण सामान्य प्रवासातही काटकसर करावी लागायची. पण याच साध्या प्रवासाने मला आयुष्यभर पुरेल असा एक धडा दिला.

दिल्लीला जाताना रेल्वे मार्गालगतच्या भिंतींवर, मैलोनमैल एकच गोष्ट मोठ्या अक्षरात रंगवलेली दिसायची. फक्त एकाच शब्द – ‘रिश्ते...रिश्ते....रिश्ते’. मोठा ब्रश घेऊन कोणीतरी ते अक्षरशः मैलोनमैल लिहीत गेलं होतं. सतत तो एकाच शब्द वाचून मी विचार करायचो, "हे नक्की काय आहे? कसली जाहिरात आहे?"

काही किलोमीटर पर्यंत एकच गोष्ट दिसत राहायची – 'रिश्ते'.

मग पुन्हा काही किलोमीटर पर्यंत लिहिलेलं असायचं "एक बार मिल तो ले".

मी विचार करायचो की कोणाला भेटायचं ? का भेटायचं ? त्याने नाव पण का लिहिलं नाहीये ?

आणि मग पुन्हा काही किलोमीटर पर्यंत लिहिलेलं असायचं "२७ , रेगतपुरा, करोलबाग, नई दिल्ली"

तो पत्ता पण पुढे कित्येक किलोमीटर सारखा सारखा दिसत राहायचा. इतका की आजही माझ्या लक्षात आहे.

या अनोख्या जाहिरातीमुळे माझ्या मनात कुतूहल वाढत गेलं. एक प्रकारची ओढ निर्माण झाली.

शेवटी, कधीतरी मधेच, 'रिश्ते' च्या पुढे अजून काही शब्द दिसायचे, जे त्या जाहिरातीचा अर्थ स्पष्ट करायचे. तेव्हा मला समजलं, ती एका मॅट्रिमोनियल व्यवसायाची जाहिरात होती! "विवाह योग्य मुला-मुलींना त्यांच्या कुटुंबियांमार्फत भेटवून देणारी कंपनी." काय गजब कल्पना!

त्या माणसाने खूप पैसा खर्च केला नाही, फक्त गावोगावी जाऊन भिंतींवर ते नाव लिहिलं. त्यातून लोकांना गुंतवून ठेवलं. जाहिरातीचा हा 'टीझर' (teaser) बघून लोकांना फक्त उत्सुकता वाटली नाही, तर पुढे काय लिहिलं आहे हे पाहण्यासाठी लक्ष ठेवून त्या जाहिरातींकडे पाहत होते. त्या काळात याला 'टीझर' म्हणत नसत, पण माझ्या मते ती 'टीझर जाहिरातीची जननी' होती.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी

https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

अनेक वर्षांनंतर, जेव्हा मी स्वतः जाहिरात क्षेत्रात आलो, तेव्हा मला ती 'रिश्ते" ची जाहिरात आठवली. त्या क्रिएटिव्ह माणसाला भेटण्याची इच्छा मनात होती. मी त्यांच्या कार्यालयात गेलो. दुर्दैवाने, त्या जाहिरातीचा खरा निर्माता, तोपर्यंत हयात नव्हता. तिथे एक महिला होती, जी आता तो व्यवसाय सांभाळत होती. पण आधीसारखा तो व्यवसाय चालत नव्हता. मी तिच्याशी खूप गप्पा मारल्या. पण मनात एक खंत राहिली, "मी दहा वर्षांपूर्वीच इथे आलो असतो आणि त्या खऱ्या माणसाला भेटलो असतो!"

त्या दिवसाची आठवण मला आजही खूप काही शिकवून जाते. जाहिरात म्हणजे केवळ माहिती देणं नाही, तर लोकांशी संवाद साधणं, त्यांना गुंतवून ठेवणं आणि त्यांच्या मनात एक स्थान निर्माण करणं. ती जाहिरात साधी असली, तरी तिच्यामागे मानवी मनाचं, कुतूहलाचं आणि संवादाचं अद्भुत ज्ञान होतं. आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक जण मोठ्या आवाजात बोलू पाहतोय, तिथे 'रिश्ते' ची ती भिंतीवरची शांत जाहिरात मला 'इंगेजमेंट' म्हणजेच ग्राहकाला गुंतवून ठेवण्याचं खरं महत्त्व शिकवून गेली.

======================

हा किस्सा कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सोबत पीयूषजींची कोणती जाहिरात तुम्हाला जास्त आवडते ते पण सांगा.

त्यांनी केलेल्या काही अजरामर जाहिराती -

- फेविकॉल (Fevicol): "फेविकॉलचा मजबूत जोड आहे, तुटणार नाही."

- कॅडबरी डेअरी मिल्क (Cadbury Dairy Milk): "कुछ खास है जिंदगी में"

- एशियन पेंट्स (Asian Paints): "हर घर कुछ कहता है"

- बजाज ऑटो (Bajaj Auto): "हमारा बजाज" (आपलं बजाज)

- कायनेटिक लूना (Kinetic Luna): "चल मेरी Luna"

- व्होडाफोन (Vodafone - पूर्वीची Hutch): पग् कुत्रा (Pug Dog) आणि मुलाची मैत्री ( "You and I..." )

- फेविक्विक (Fevikwik): "चुटकी में चिपकाये"

- पॉन्ड्स कोल्ड क्रीम (Pond's Cold Cream): "Googly Woogly Woosh"

- पल्स पोलिओ मोहीम (Pulse Polio Campaign): "दो बूँद जिंदगी की"

- राजकीय स्लोगन (Political Slogan): "अबकी बार, मोदी सरकार"

- राष्ट्रीय एकता : "मिले सूर मेरा तुम्हारा"

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

What would you like to learn today?