रशिया-युक्रेन-चायना-भारत !

रशिया- युक्रेन परिस्थिती चिघळत आहे आणि पूर्ण जगाची चिंता त्यामुळे वाढली आहे. पुढे काय घडणार आहे हे सांगता येणे कुणालाही शक्य नाही. मात्र काही दिवसांपूर्वी घडलेल्या चीन-रशिया मधील घडामोडी पाहता अंदाज बांधता येतील.

या महिन्याच्या सुरुवातील बीजिंग ऑलिम्पिक मध्ये व्लादिमिर पुतीन आणि ची जिनपिंग यांचे अनेक फोटो मीडिया मध्ये प्रसिद्ध झाले. नुसतेच बोरिंग राजकीय फोटो नव्हे तर अगदी ठरवून फोटो सेशन केल्यासारखे. अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियाचे राजकीय प्रतिनिधी मात्र बीजिंग ऑलिंपिक्स साठी उपलब्ध नव्हते. या तीनही देशांनी चीन मध्ये होणाऱ्या मानवी हक्क उल्लन्घनचे कारण पुढे करून बीजिंग ऑलिंपिक्सवर बहिष्कार टाकला होता.

वरील देशांच्या अनुपस्थितीत, पुतीन आणि जिनपिंग यांनी हातात हात घेऊन काढलेल्या या फोटोंमुळे आणि त्यांनी केलेल्या काही ठळक विधानांमुळे आगामी हालचालींचा संपूर्ण जगाला एक संदेशच दिला होता.

चीनने यूरोपातील NATOच्या वाढत्या हालचालीं थांबवण्याची मागणी करत असलेल्या रशियाला जाहीर पाठिंबा दिला आणि याची परतफेड म्हणून रशियाने चीनच्या तैवान वरील अधिकाराला पाठिंबा दिला.

रशियाला युक्रेन पाहिजे आणि चीनला तैवान. यासाठी हे दोन्ही देश एकमेकाला मदत करत आहेत. रशिया मिलिटरी सुपरपॉवर आहे आणि चीन आर्थिक सुपरपॉवर. दोघांना एकमेकांची ताकद वापरायची आहे. आणि मुख्य म्हणजे दोन्ही देशांच्या सीमारेषा एकमेकांना जोडणाऱ्या आहेत. या दोन्ही देशांची हातमिळवणी जगाला डोकेदुखी ठरू शकते.

युरोपिअन देश आणि अमेरिका आपल्यावर दबाव/निर्बंध आणणार हे रशियाला ठाऊक होतेच. चीनच्या मार्गाने रशियाने यावर आधीच उपाय शोधून ठेवला आहे. रशियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जो पैसा पाहिजे तो चीन पुरवू शकते. रशियाला आपले तेल विकायचे आहे त्यासाठी चीन हाच सर्वात मोठा ग्राहक आहे . रशियाला आपली मिलिटरी टेक्नॉलॉजी विकायची आहे आणि चीनला आपल्या मिलटरीला अद्ययावत करण्यासाठी त्याची गरज आहे.

चीनला तैवान वरील आपल्या हक्काला दुजोरा देईल असे देश पाहिजे आहेत. रशिया याकामी त्यांना मदत करेल. चीनला मिलिटरी सुपरपॉवर बनण्यासाठी रशियाची मदत लागेल आणि चीनच्या फॅक्टऱ्या सुरु ठेवण्यासाठी तेलाचा अविरत पुरवठा लागेल त्यासाठी पण रशियाच त्यांना मदत करू शकेल.

दोन्ही देशांना अमेरिका आवडत नाही. एक सुपरपॉवर म्हणून जगावर राज्य करण्याची इच्छा असलेल्या या देशांना अमेरिका हाच मोठा अडसर आहे. रशिया आणि चीन यांनी हातमिळवणी करून एक जॉईंट सुपरपॉवर अस्तित्वात आणली आहे. इतिहासात जेव्हा जेव्हा अशी जोडगोळी बनली तेव्हा तेव्हा जगाची डोकेदुखी वाढली आहे.

खरतर रशिया-युक्रेन युद्धात चीनचे आर्थिक नुकसान आहे. कारण युक्रेन मध्ये एक्स्पोर्ट करणाऱ्या देशांमध्ये चीनचा पहिला क्रमांक आहे. युद्धामुळे काही बिलियन डॉलर्सचा तोटा चीनला सहन करावा लागेल. पण "दूरका फायदा" बघून चीनने या "नजदिकका नुकसान" कडे दुर्लक्ष केलं आहे. चीनचे आर्थिक अंकित देश, चीन आणि रशिया एका बाजूला व अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया एका बाजूला असे दोन बलाढ्य गट तयार झाले आहेत.

भारताने तर सध्या कोणतेही बाजू न घेता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दीर्घकाळ तटस्थ राहणे भारताला शक्य होणार नाही. शत्रू चीन उद्या आपल्यालाच त्रास देणार आणि मित्र रशियाच याकामी चीनला मदत करेल किंवा मित्र रशिया शत्रू चीन बरोबर संबंधांसाठी मध्यस्थी करू शकेल. दोन्ही संभावना शक्य आहेत.

पंडित नेहरू यांना रशिया-अमेरिका शीतयुद्धामध्ये दोन्ही देशांची स्पष्ट बाजू न घेता, दोघांनाही झुलवत ठेवणे शक्य झालं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे शिवधनुष्य उचलायचे आहे.

दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये उद्भवलेला कोरोना आपलं जीणं मुश्किल करेल असं कोणत्याही भारतीयाला तेव्हा वाटलं नसेल.....मात्र तसं झालं खरं ! त्याचप्रमाणे आज युक्रेन मध्ये असलेलं युद्ध कदाचित उद्या आपल्या दाराशी देखील येऊ शकेल. जात, धर्म, समाज, पक्ष यांच्या वादातून उसंत मिळाल्यास या मोठ्या घडामोडीकडे पण लक्ष जावं म्हणून हा लेखप्रपंच !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !