साबणाचा पुनर्जन्म

हॉटेल रूम मध्ये चेक इन केल्यानंतर, बॅग्ज ठेवून आपण सहसा पहिल्यांदा वॉशरूम कडे वळतो. बाथरूम काउंटर पाशी ठेवलेला आकर्षक पॅकिंग मधला साबण वापरतो. प्रत्येक हॉटेल अतिशय चोखंदळपणे साबण, शॅम्पू, त्यांचे पॅकिंग, त्यावरील ब्रॅण्डिंग याकडे लक्ष देऊन निवडत असते. पण हे छोटे आकर्षक साबण पुढे जाऊन त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते. १-२ दिवस वापरून ग्राहक साबण तसाच ठेवतात (काही ग्राहक घरी नेतातही !) आणि त्या उरलेल्या साबणाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉटेल्स कडे येऊन पडते. तुम्ही म्हणाल एका छोट्याश्या साबणाला इतकं काय महत्व द्यायचं ? पण मित्रांनो तसं नाहीये !

हा खरंतर जगभरात एक मोठा प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ भारतातच बघा. भारतात साधारण ५०००० हॉटेल्स असतील असं गृहीत धरूया (प्रत्यक्षात जास्तच असतील) , प्रत्येक हॉटेल मध्ये सरासरी १० रूम्स धरल्या तर एकूण ५ लाख रूम्स आहेत. ७०% occupancy rate ने साधारण ३.५ लाख रूम्स दररोज वापरल्या जातात म्हणजेच दररोज ३.५ लाख साबण थोडेसे वापरून फेकून दिले जात आहेत. या साबणांचं काय करायचं ? असा प्रश्न खचितच हॉटेल मधील कुणा गेस्टला पडला असेल ! पण १४ वर्षांपूर्वी अमेरिकेत एका माणसाला हा प्रश्न पडला. नुसत्या प्रश्नावर तो थांबला नाही तर त्याचं उत्तरही त्याने शोधलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्या उत्तराने जगभरातील हजारो लोकांचे प्राण वाचवले ! त्याने साबणाला पुनर्जन्म दिला आणि अनेकांना मृत्यूपासून वाचवलं ...त्याची ही गोष्ट वाचायला नेटभेटच्या वाचकांना नक्की आवडेल !

अमेरियकेतील शॉन सिपलर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत होता. शॉन ला कामानिमित्त जगभर फिरावं लागत असे. इतकं की वर्षातील १५०-२०० दिवस तो हॉटेल्स मध्येच राहत असे. २००८ साली अशाच एका हॉटेल मध्ये शॉन थांबला होता तेव्हा त्याला अर्धवट वापरलेल्या साबणाचं पुढे काय होतं हा प्रश्न पडला. त्याने लागलीच रूम सर्विसला फोन केला आणि "वापरलेल्या साबणांचं तुम्ही काय करता ?" हा प्रश्न विचारला. उत्तर आलं, आम्ही वापरलेले साबण फेकून देतो. शॉन ने थोडी आकडेमोड केली आणि त्याला लक्षात आलं की लाखो साबण दररोज फेकले जात आहेत. यावर आपण काहीतरी करायला हवं. तो विचार त्याच्या डोक्यात घर करून बसला. काही आठवड्यानंतर तो जेव्हा घरी परतला तेव्हा जवळच असलेल्या Holiday Inn हॉटेल मध्ये जाऊन त्याने हाच प्रश्न विचारला. उत्तर ही तेच मिळालं. त्याने मॅनेजरला विचारलं टाकून देण्याऐवजी तुम्ही हे साबण मला द्याल का ? मॅनेजर ने होकार दिला. त्याच दिवशी त्याने सहा आणखी हॉटेल्सना भेट दिली आणि सगळ्या हॉटेल्सने होकारच दिला.

एका महिन्यातच शॉन हजारो असे साबण घेऊन आला आणि मित्रांच्या साहाय्याने आपल्या गॅरेज मध्येच एक छोटेखानी वर्कशॉप सुरु केले. त्याने बटाटे सोलावेत तसे साबणाचा बाहेरचा भाग सोलून काढला. त्यानंतर ग्राइंडर मध्ये टाकून साबणांचा चुरा केला. हा चुरा वितळवून नंतर साबणांच्या मोल्ड मध्ये टाकला. एक रात्री सुकविल्यानंतर दुसर्या दिवशी साबणाच्या वड्या कापल्या. आणि नवीन साबण तयार ! या सगळ्यासाठी त्याने किचन मध्ये वापरली जाणारे टूल्सच वापरले. या त्याच्या गॅरेजमधून लवकरच तो दररोज ५०० साबण तयार करू लागला. साबण तयार तर होऊ लागले पण त्यांचं करायचं काय ?

शॉनच्या वाचनात हे आले होते की जगभरात दररोज सुमारे ९००० बालके अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे मरण पावतात. यापैकी निम्याहून जास्त मृत्यू केवळ नियमित हात धुतल्याने टाळता येऊ शकतात. आपण तयार केलेले साबण अनेक गरीब देशांतील या बालकांपर्यंत पोहोचविण्याचा शॉनचा प्रयत्न होता. यासाठीच त्याने Clean The World नावाची संस्था सुरु केली.

=====================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
=====================

कल्पना उद्दात्त असली तरी प्रत्यक्षात उतरवणे कठीण होते. हजारो हॉटेल्स मधून साबण गोळा करून, प्रोसेस करून , दूरवरच्या अनेक देशांत पोहोचविणे logistics च्या दृष्टीने कठीण होते आणि यासाठी पैसा उभारावा लागणार होता. देणगी देणाऱ्या अनेक संस्थांकडे त्याने प्रयत्न केले पण पैसे उभे करणे जमत नव्हते. इकडे साबणाचा साठा पण वाढत होता. लवकरच काही केले नसते तर शॉनला हा पूर्ण प्रकल्पच बंद करावा लागणार अशी चिन्हे दिसत होती.

तेव्हाच शॉन सिपलर ने एक नवीन बिझनेस मॉडेल वापरायचे ठरवले. (आपल्या कडील उद्योजकांना यातून प्रेरणा मिळावी हा या लेखाचा मूळ उद्देश आहे !) त्याने स्वतःच्या संस्थेला एक प्लॅटफॉर्म बिझनेस बनविले. जसा उबर हा ग्राहक आणि टॅक्सीचालक याना जोडणारा एक प्लॅटफॉर्म आहे तसा clean the world हा हॉटेल्स आणि गरजू बालके याना जोडणारा प्लॅटफॉर्म आहे. यात दोन्ही बाजूना फायदा व्हावा अशी योजना असते. शॉनने clean the world मध्ये सहभागी होणाऱ्या हॉटेल्सना प्रत्येक रूममागे १ डॉलर प्रति महिना अशी नाममात्र फी आकारायला सुरुवात केली. या फी मध्ये हॉटेल्सना तीन फायदे झाले. पहिला म्हणजे साबणाची विल्हेवाट लावण्याच्या जबाबदारीतून मुक्ती , दुसरा म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने Sustainability Goals पूर्ण करण्यासाठी मदत आणि तिसरा म्हणजे हॉटेलचा सोशल इम्पॅक्ट दाखविण्याची सोय !

त्याचसोबत United Nations, Unicef, children International या संस्थांसोबत काम करून साबणाची आवश्यकता जिथे आहे , तिथे ते पाठविण्याची सोय केली. लोकल क्लिनिक्स आणि शाळांसोबत या संस्था काम करतात. लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व शिकवतात, साबण वाटप आणि वापराची देखरेखही करतात. सध्या Clean the world ८००० हॉटेल्स (१.५ मिलियन रूम्स) सोबत काम करत आहेत, जगभरात ८ पेक्षा जास्त देशांत साबण प्रोसेस करण्याचे कारखाने त्यांनी सुरु केले आहेत. १२७ देशांत सात करोड साबण आतापर्यंत त्यांनी पोहोचवले आहेत आणि हे करत असताना समुद्रात/जमिनीत जाणारा २३ मिलियन पाउंड कचरा कमी केला आहे. सीरिया मधील रेफ्युजी, सोमालिया, बांगलादेश, पाकिस्तान, झाम्बिया, होन्डुरास हे आफ्रिकन देश सगळ्यात मोठे लाभार्थी ठरले आहेत.

अजूनही जगातील ३ बिलियन लोकांकडे साबणासारखी साधी पण जीवनावश्यक सुविधा पोहोचलेली नाही. आणि अजूनही हजारो हॉटेल्स साबण फेकून देत आहेत. clean the world पासून प्रेरणा घेऊन इतर देशांमध्येही असं काम करणाऱ्या संस्था उभ्या राहू लागल्या आहेत. शॉनने एकापेक्षा अधिक प्रॉब्लेम्स आपल्या युनिक आयडीयाने सोडवले आहेतच, तेही कुणाच्या देणगीवर अवलंबून न राहता एक प्रोफीटेबल बिझनेस उभारून ! आजही शॉन सगळ्यांना हेच सांगतो ...तुमच्या बेसिनवर पडून असलेला तो साबणाचा तुकडा कुणाचातरी जीव वाचवू शकतो...तो वाया घालवू नका !

मंडळी नेटभेटच्या वाचकांसाठी आम्ही असेच अनेक उपयुक्त लेख, विडिओ मराठीतून आणत असतो. तेही विनामूल्य ! तुम्ही देखील हे ज्ञान आपल्याकडे न ठेवता पुढे पाठवा... न जाणो कुणी "शॉन" हे वाचेल आणि जगाला वाचवेल !

असे आणखी लेख व उपयुक्त माहिती व्हाट्सअँपवर मिळविण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा, लिंक कमेंट मध्ये दिली आहे!)

धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !