There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
जगातील सर्वात उंच इमारत... आणि सर्वात मोठा धडा
१९२० च्या भरभराटीच्या दशकात, न्यूयॉर्क शहर वेगाने प्रगती करत होते. मोठमोठे रस्ते, गगनचुंबी इमारती, प्रचंड मोठे कारखाने शहराचा कायापालट करत होत्या.या केवळ वास्तू नव्हत्या—त्या मानवी महत्त्वाकांक्षा आणि अभिमानाची प्रतीके होत्या. त्यांच्यामध्ये, दोन मनोरे एका शक्तिशाली दाव्यासाठी लढणार होते: “जगातील सर्वात उंच इमारत.”
वॅन ऍलन आणि क्रेग सेव्हरन्स या दोन आर्किटेक्ट मध्ये जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याची स्पर्धा चालू होती. ही केवळ व्यावसायिक स्पर्धा नव्हती तर वैयक्तिक होती.
वॅन ऍलन आणि क्रेग सेव्हरन्स हे एकेकाळचे बिझनेस पार्टनर होते. नावाजलेले आर्किटेक्ट होते. व्यवसाय चांगला चालू होता. मोठमोठी कामं त्यांच्या नावावर मिळत होती. वॅन त्याच्या जबरदस्त डिझाइन्स आणि तांत्रिक ज्ञानाबद्दल प्रसिद्ध होता. क्रेग पण चांगला आर्किटेक्ट होता पण तो जास्त चांगला बिझनेसमॅन होता. क्लाएंट आणणे, वाटाघाटी करणे आणि प्रोजेक्ट सुपूर्त करेपर्यंत गोड शब्दात ग्राहकांसोबत नातं जोडून ठेवणे यासाठी प्रसिद्ध होता.
जसजसे त्यांचे बँक अकाउंट फुगत होते तसतसा त्यांचा ईगोही फुगत होता. हळूहळू दोघांच्याही मनात एकमेकांविषयी मत्सर तयार होऊ लागला. ग्राहक जेव्हा म्हणायचा की क्रेग हजर असला तरच चर्चा करूया तेव्हा वॅनला राग यायचा आणि जेव्हा वृत्तपत्रात /मासिकांमध्ये वॅनच्या अनोख्या डिझाइन्सची प्रशंसा व्हायची ती वाचून क्रेगचा जळफळाट व्हायचा. बहुतांश बिझनेस पार्टनर्स मध्ये जे होते तेच इथे पण झाले. दोघांचे वाद होऊ लागले, ते वाद वाढले आणि अतिशय वाईट प्रकारे शेवटी दोघे वेगळे झाले.
वेगळे झाल्यानंतर वॅनला पहिले काम मिळाले एका मोठ्या उद्योजकासाठी मॅनहॅटन येथे एक उंच इमारत उभी करण्याचे. त्याच वेळी क्रेग कडे एक काम आले "बँक ऑफ मॅनहॅटन" साठी ४० , वॉलस्ट्रीट हा एक उंच मनोरा बांधण्याचे. आणि इथेच स्पर्धा सुरु झाली “जगातील सर्वात उंच इमारत.” बांधण्याची.
वॅनचे पहिले प्रपोजल होते ८०९ फूट उंचीचे. क्रेगचे प्रपोजल होते ८४० फूट उंचीचे. जेव्हा वॅनला कळले की आपली इमारत ३१ फुटांनी लहान असणार आहे तेव्हा त्याने ब्ल्यूप्रिंट मध्ये २ माजले आणखी चढवले. हे कळल्यानंतर क्रेगने एक मजला आणखी वाढवला. लवकरच दोघांच्या इमारती ९०० फुटांच्या वर गेल्या. पण क्रेगकडे एक जमेची बाजू होती. त्याच्या बिल्डिंगच्या पायासाठी मोठी जागा उपलब्ध होती. पण वॅनने अनोखी युक्ती वापरली ज्यात त्याने एक अतिरिक्त स्पायर (चर्चला असते तसे शिखर) बिल्डिंगच्या वर उभे केले.
फायनल डिझाइन्स मान्य झाल्या तेव्हा वॅनची बिल्डिंग सर्वात उंच असणार यावर शिक्कामोर्तब झाले. वॅनची बिल्डिंग जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग ठरणार होती. पण क्रेग इतक्या सहज हार मानणारा नव्हता. त्याने शेवटच्या क्षणी एक माणूस जेमतेम उभा राहू शकेल एवढे शिखर बिल्डिंगवर उभे केले. आणि ९२७ फुटांची उंच इमारत उभी केली.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
पण वॅनही काही कच्चा खेळाडू नव्हता. त्याने एक मोठे फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर (स्टीलचा सापळा) तयार करून बिल्डिंगच्या आत लपवला होता. क्रेगची बिल्डिंग तयार झाल्यानंतर ३० दिवसांच्या आताच वॅनने ते १८५ फुटांचे ते महाकाय स्ट्रक्चर बिल्डिंगवर चढवले आणि "जगातील सर्वात उंच बिल्डिंग" बनविण्याचा मान मिळवला.
वॅन या उंचीच्या स्पर्धेत जिंकला होता खरा पण त्याच्याकडून एक चूक झाली होती. जी चूक क्रेग कडून कदाचित कधीच झाली नसती. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर जी फी वॅनला मिळणार होती त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही गोष्टी स्पष्ट नव्हत्या. ज्या उद्योजकाने ती बिल्डिंग बनवून घेतली त्याने पूर्ण पैसे देण्यास नकार दिला. शेवटी वॅनला कोर्टात जावे लागले. कायदेशीर लढाईला विलंब लागला. जरी वॅनला त्याचे पैसे मिळाले तरी क्लाएंट सोबतच्या कायदेशीर लढाईमुळे त्याचे नाव खराब झाले.
त्याने बांधलेली "जगातील सर्वात उंच बिल्डिंग" त्याचे अंतिम प्रोजेक्ट ठरले. बिल्डिंगची उंची गाठता गाठता त्याने स्वतःची प्रतिष्ठा कमी करून घेतली. आणि बिल्डिंगची उंची देखील त्याला फार काळ मिरवता आली नाही कारण केवळ दोनच वर्षात जगातील सर्वात उंच बिल्डिंगचा मान तिसऱ्याच एका इमारतीकडे गेला.
उद्योजकांसाठी धडा -
उत्पादनासोबत 'पेपरवर्क' (Contract) महत्त्वाचे: केवळ उत्कृष्ट डिझाईन किंवा प्रॉडक्ट (उंची) बनवून फायदा नाही; तुमचा व्यवसाय, पैसा आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवण्यासाठी कायदेशीर पाया (Legal Foundation) आणि स्पष्ट करार (वॅन ऍलनची चूक) मजबूत असणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
प्रतिष्ठा ही तात्पुरत्या विजयापेक्षा मोठी असते: स्पर्धेतील यश (सर्वांत उंच इमारत) अल्पकाळ टिकते, पण व्यावसायिक नीतिमत्ता (Ethics) आणि क्लाएंटसोबतचे संबंध टिकवून ठेवणे (वकिली लढाई टाळणे) दीर्घकाळात अधिक फायदेशीर ठरते.
भागीदारी: वॅन ऍलनमध्ये तांत्रिक कौशल्य होते, तर क्रेग सेव्हरन्सकडे चांगले व्यवसाय कौशल्य होते. त्यांनी जेव्हा ईर्ष्येमुळे भागीदारी तोडली, तेव्हा दोघांचेही नुकसान झाले. एकट्याने १०० टक्के मिळवण्यापेक्षा, एकत्र राहून त्यातील ५० टक्के हिस्सा मिळवणे जास्त चांगले. यशस्वी भागीदारीसाठी, व्यक्तींच्या अहंकाराऐवजी, त्यांच्या पूरक (Complementary) कौशल्यांचा आदर करा आणि स्पष्ट भूमिका ठरवा.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !