There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
काही दिवसांपूर्वीच नेपाळ मध्ये सरकार उलथून देणारी हिंसक चळवळ झाली. अनेकांना अशी चळवळ भारतात होईल अशी भीती वाटली आणि अनेकांना अशी चळवळ भारतात व्हावी अशी इच्छा देखील झाली. तेव्हा मला मी वाचलेल्या ३ .५ % च्या नियमाची आठवण झाली. पण वेळेअभावी त्याबद्दल लिहिणे जमले नव्हते. आता लिहितोय.
मानवजातीच्या इतिहासात सत्ताधारी वर्ग आणि सामान्य लोक यांच्यात संघर्ष नेहमीच झाला आहे. हा संघर्ष कधी शांततामय बंद किंवा निदर्शने करून झालेला आहे तर अनेकदा रक्तरंजित युद्धाच्या स्वरूपात दिसला आहे.
हार्वर्ड मधील राज्यशास्त्र अभ्यासक एरिका चेनोवेथ यांनी जगभरातील अशा आंदोलनांचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातूनच त्यांनी "सडे तीन टक्क्यांचा नियम" मांडला आहे.
एरिका चेनोवेथ आणि संशोधक मारिया स्टेफन यांनी १९०० ते २००६ या कालावधीतील जगभरातील राजकीय आंदोलनांचे कठोर विश्लेषण केले.
एकूण आदोलनांपैकी केवळ यशस्वी आंदोलनांचा आणखी अभ्यास केला. त्यांना अशी ३२३ आंदोलने आढळली.
यशस्वी आंदोलनाचे निकषही स्पष्ट होते –
१ . आंदोलनाच्या कृतीमुळे एका वर्षाच्या आत सत्ताबदल झाला पाहिजे.
२ . हा बदल केवळ आंदोलनानेच झाला पाहिजे. परकीय सैन्याने हस्तक्षेप करून सत्ता बदलली, तर ते यश मानले जाणार नाही.
तसेच आंदोलनात स्फोट, अपहरण, मालमत्तेचे नुकसान वगैरे घडले असेल तर ते हिंसक मानले. अन्यथा ते अहिंसक अंदोलन म्हणून मानले.
(भारताचा स्वातंत्र्यलढा अंशतः यशस्वी मानण्यात आला होता. कारण अहिंसक मोहिमेच्या सर्वोच्च बिंदूपासून सत्तापालटाला एक वर्षापेक्षा जास्त अवधी लागला होता. यावरून चेनोवेथ यांच्या संशोधनाचे निकष किती कठीण होते याची कल्पना येते.)
या संशोधनाचे निकाल आश्चर्यचकित करणारे होते. चेनोवेथ यांच्या अभ्यासानुसार अहिंसक मोहिमांपैकी सुमारे ५३% वेळा राजकीय बदल साध्य झाले होते, तर हिंसक मोहिमांपैकी फक्त २६% वेळा. आणि अभ्यासातील २५ सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी, २० अहिंसक होती, व त्यापैकी १४ पूर्णपणे यशस्वी ठरली. Netbhet
म्हणजेच अहिंसक मोहिमा हिंसक मोहिमांपेक्षा दुप्पट जास्त यशस्वी ठरल्या होत्या.
यातील काही उदाहरणांचा उल्लेख केलाच पाहिजे.
- १९८६ मध्ये फिलिपिन्समध्ये घडलेले पीपल पॉवर मूव्हमेंट हा इतिहासातील एक महत्वाचा टप्पा. लाखो लोकांनी प्रार्थना, गाणी आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात शांतपणे आंदोलन केले. फक्त चार दिवसांत काही दशकांपासून सत्तेत असलेले मार्कोस सरकार कोसळले.
- २००३ मध्ये जॉर्जियात घडलेली रोज रेव्होल्युशन ही देखील रक्ताशिवाय झालेली क्रांती होती. आंदोलनकर्त्यांनी संसदेत प्रवेश केला, पण त्यांच्या हातात बंदुका नव्हत्या तर गुलाब होते. हा प्रतीकात्मक क्षण लोकांच्या एकतेचे प्रतिक ठरला.
- १९८० च्या दशकात एस्टोनियामध्ये सिंगिंग रेव्होल्युशन घडली. लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून गाणी म्हणत सोव्हिएत युनियनविरुद्ध आवाज उठवला. हे आंदोलन इतके सामर्थ्यशाली ठरले की शेवटी एस्टोनियाला स्वातंत्र्य मिळाले.
- २०१९ मध्ये सुदान आणि अल्जेरियाचे दीर्घकालीन हुकूमशहा यांना पद सोडायला भाग पाडले गेले – तेही अहिंसक जनआंदोलनामुळे.
सामान्य जनतेला सरकार उलथून लावायचे असेल तर अहिंसक मार्गाने केलेले जनआंदोलन जास्त परिणामकारक ठरेल हे अभ्यासामुळे जगाला कळले. पण अहिंसक आंदोलनच का यशस्वी ठरते याचेही सखोल विवेचन चेनोवेथ यांनी केले आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
- नैतिक श्रेष्ठता: हिंसेच्या तुलनेत अहिंसक आंदोलन नैतिकदृष्ट्या अधिक स्वीकारले जाते. सामान्य नागरिक प्रशिक्षित सैनिक नसतात. त्यामुळे हिंसक आंदोलनापासून बरेच लोक दूर राहणे पसंद करतात.
- व्यापक सहभाग: संप, बहिष्कार, शांततामय मोर्चा – यासाठी शरीराने तंदुरुस्त असणे गरजेचे नाही. त्यामुळे समाजातील सर्व घटक जसे की वृद्ध, महिला, विद्यार्थी सर्वजण यात सहभागी होऊ शकतात.
- जास्त प्रसार: शांततामय आंदोलनाबाबत उघडपणे चर्चा करता येते, प्रसारमाध्यमांमध्ये जागा मिळते. हिंसक आंदोलन मात्र गुप्तपणे करावे लागते .त्यामुळे त्याचा प्रसार करताच येत नाही.
- सुरक्षादलांवर परिणाम: जेव्हा लाखो निरपराध लोक रस्त्यावर येतात, तेव्हा सैन्यदलातील अनेकांच्या नजरेसमोर त्यांचे कुटुंबीयच येतात. अशा वेळी ते कारवाई करण्यास धजत नाहीत.
या सर्व कारणांमुळे अहिंसक जनआंदोलन यशस्वी होण्याची शक्यता खूपच वाढते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अहिंसक जनआंदोलन यशस्वी होतेच. चेनोवीथ यांनी अहिंसक आंदोलनांच्या अपयशाचीही कारणमीमांसा केली आहे. आणि याबाबतच त्यांनी "साडे तीन टक्क्यांचा" नियम मांडला आहे.
त्यांच्यामते जेव्हा जेव्हा लोकसंख्येच्या किमान ३.५% लोक सक्रिय सहभाग घेतात, तेव्हा तेव्हा अपयशाची शक्यताच संपते.”
फिलिपिन्स, एस्टोनिया, जॉर्जिया – या साऱ्यांनी हा टप्पा गाठला आणि यश मिळवले.
पण १९५० च्या दशकात पूर्व जर्मनीतील ४ लाख लोक सहभागी झालेले आंदोलन अपयशी ठरले. कारण लोकसंख्येच्या फक्त २% लोक सहभागी झाले होते.
२०११ मधील बहारीन येथील उठाव सुरुवातीला मोठा होता, पण पुढे गटांत विभागला गेला आणि त्यामुळे अपयशी ठरला.
लोकसंख्येच्या साडेतीन टक्के लोकांनी जर सक्रिय सहभाग घेतला, आणि हे ऐक्य वर्षभर टिकून राहिले तर सत्तापालट अहिंसक मार्गाने करणे शक्य आहे.
भारताची लोकसंख्या १४५ कोटी आहे. साडेतीन टक्क्यांच्या नियमानुसार जवळपास पाच करोड लोक जेव्हा सत्ताबदलासाठी एकत्र येतील तेव्हा भारतासारख्या देशातही अशी चळवळ यशस्वी होऊ शकेल. परंतु १४५ कोटींची लोकसंख्या एकसंध नाही. ती वेगवगेळ्या भाषा/राज्य/धर्म/जाती यांमध्ये विखुरलेली आहे. आणि जोपर्यंत भारतीय मनाने विखुरलेले राहतील तोवर निर्णायक जनआंदोलन उभारणे भारतीयांना शक्यच होणार नाही.
आपल्याला नेहमी इतिहासात युद्धकथा, लढाया आणि रक्तपात यांच्याच गोष्टी सांगितल्या जातात. पण खरं तर जग बदलणारी मोठी ताकद ही सामान्य लोकांची, त्यांच्या अहिंसक पण ठाम आंदोलनाची आहे.
एरिका चेनोवेथ सांगतात -
“सामान्य लोकच हिंसा न करताही खरे शौर्य दाखवू शकतात. तेच जग बदलतात. पण त्यांना फार कमी वेळा गौरव मिळतो.”
शस्त्र नव्हे – तर दृढनिश्चय, ऐक्य आणि ३.५% लोकांचा सक्रिय सहभाग – हाच जग बदलण्याचा खरा मार्ग आहे.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !