There are no items in your cart
Add More
					Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
						१८१९ साली, नेपोलियन बोनापार्टच्या फ्रेंच सैन्यातील एका तोफखान्याच्या कप्तान चार्ल्स बार्बियर (Charles Barbier) यांना एक समस्या जाणवली. रात्रीच्या लढायांमध्ये सैनिकांना संदेश वाचण्यासाठी दिवे लावावे लागत, ज्यामुळे शत्रूला त्यांची जागा उघड होत असे आणि जीवितहानी वाढत असे.
यावरून चार्ल्सला प्रश्न पडला की अशी पद्धत शोधता येईल का की ज्यामुळे रात्रीच्या अंधारातही दिवा न लावता सैनिकांना संदेश वाचता येईल ? त्याने "अंधारात वाचण्याची पद्धत" शोधायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने धातूच्या / कागदाच्या पट्टीवर बारा ठिपक्यांच्या साहाय्याने एक अक्षर लिहिण्याची पद्धत शोधली. पण ही पद्धत फारच किचकट होती. त्यामुळे सैन्याने ती पद्धत नाकारली.
त्यानंतर दोन वर्षांनी एका बारा वर्षाच्या मुलाला कुणाकडून तरी चार्ल्सने शोधलेल्या "अंधारात वाचण्याच्या पद्धती" बद्दल माहिती मिळाली. तो मुलगा लहान असताना त्याच्या वडिलांच्या सोबत काम करत होता. तेव्हा झालेल्या एका अपघातात त्याची दृष्टी गेली होती.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
त्याने चार्ल्स ने बनविलेली पद्धत शिकून घेतली. त्यालाही ती पद्धत कठीणच वाटली. पण त्याने ती पद्धत नाकारली नाही. उलट त्यावर काम करण्याचे त्याने ठरवले. पुढील पाच वर्षे त्या मुलाने चार्ल्सची पद्धत सुधारून एक सोपी पद्धत विकसीत केली. त्याने १२ ठिपक्यांऐवजी ६ ठिपक्यांच्या सेलमध्ये अक्षरे, संख्यांचे संकेत विकसित केले. ही नवीन पद्धत सोपी, जलद आणि शिकण्यासही सोपी होती. १८२९ साली त्याने ती पहिल्यांदा प्रकाशित केली, आणि नंतर सुधारणा करत गेला.
त्या मुलाचे नाव होते लुई ब्रेल(Louis Braille). त्याने विकसित केलेली पद्धत म्हणजे "ब्रेल लिपी" आज जगभर वापरली जाते. लुई ब्रेलच्या या ६ ठिपक्यांच्या जादूमुळे लाखो अंध व्यक्तींच्या जीवनात क्रांती झाली. ब्रेल लिपी त्यांच्यासाठी केवळ एक लेखन पद्धत नाही, तर समानतेने जगण्याची संधी देणारी संजीवनी ठरली आहे. ब्रेलमुळे ते शिकू शकले, माहितीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकले आणि सन्मानाने रोजगार मिळवू शकले.
जगाला पुढे नेणारे लोक हेच असतात, ज्यांना प्रश्न पडतो आणि जे त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वर्षानुवर्षे मेहनत करण्याची तयारी ठेवतात. चार्ल्स बार्बियर यांना रात्रीच्या समस्येने प्रश्न विचारण्यास उद्युक्त केले, आणि लुई ब्रेल यांनी दृष्टी नसतानाही भविष्याच्या दृष्टीने अथक पाठपुरावा केला.
प्रश्न पडणे आणि उत्तराचा ध्यास घेणे—या दोन गोष्टी ज्यांना साधता आल्या, त्यांनीच मानवजातीची प्रगती केली आणि जगाला एका नव्या उंचीवर नेले.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !