There are no items in your cart
Add More
					Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
						मी एकदा खोपोलीहून मुंबईकडे गाडी चालवत येत होतो. एक्स्प्रेस हायवेवर जायला ५ मिनिटेच शिल्लक होती. तेव्हा एका अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या गाडीचा माझ्या कारच्या साईड व्ह्यू मिररला हलकासा धक्का लागला. धक्याने आरशाची काच खाली पडली. मी थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली आणि रस्त्यात पडलेली ती काच उचलायला जाणार तोच समोरून आलेल्या दुसऱ्या एका गाडीखाली ती काच चिरडली गेली.
संध्याकाळची वेळ होती. आतल्या रिअर व्ह्यू मिररच्या मदतीने एक्स्प्रेस हायवेवर गाडी चालवायची होती. शेवटच्या लेन मध्ये राहून हळूहळू गाडी चालवत कसाबसा मुंबई पर्यंत पोचलो . तेव्हा लक्षात आलं की सुरक्षित गाडी चालवण्यासाठी ही छोटीशी आरशाची काच किती महत्वाची आहे.
गाडीसाठी रिअर व्ह्यू मिरर ज्याने शोधला त्याचे तर आभारच मानले पाहिजेत कारण त्याच्यामुळे कितीतरी अपघात टाळले गेले असतील. पण मित्रांनो, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कदाचित पण गाडीचा रिअर व्ह्यू मिरर सुरक्षिततेसाठी बनवला गेला नव्हता....तर तो बनवला गेला होता एक नियम मोडण्यासाठी !!
११४ वर्षानुर्वी १९११ साली रेसिंग कर ड्रायव्हर "रे हॉरोन (Ray Harroun) " याने पहिल्यांदा गाडीत "रिअर व्ह्यू मिरर" वापरला. पण हा त्याचा खरा शोध नव्हता. तो ड्रायव्हर तर होताच , पण इंजिनिअरही होता. त्याला एका मोठ्या कार रेस मध्ये भाग घ्यायचा होता. त्यासाठी त्याने एक नवीन कारच डिझाईन केली होती. ही कार वेगळी होती कारण त्यात फक्त एकच सीट होती ...फक्त ड्रायव्हर साठी !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
रेस सुरु होण्याच्या दिवशी जेव्हा त्याने आपली कार आणली तेव्हा आयोजकांनी त्याला अडवलं. कारण त्यावेळी रेस कार मध्ये दोन माणसे बसत असत. एक ड्रायव्हर आणि एक मेकॅनिक. रेसच्या दरम्यान गाडी खराब झाली तर त्यासाठी मेकॅनिकची गरज होती आणि मॅकेनिकचे दुसरे काम होते मागे वळून येणाऱ्या गाड्यांची माहिती ड्रायव्हरला देणे. मॅकेनिक शिवाय गाडी चालवली तर इतर कार्सनाही अपघाताचा धोका होता. म्हणून आयोजकांनी रे हॉरोनला शर्यतीत भाग घेण्यास नकार दिला.
हॉरोनला खात्री होती की त्याची गाडी खराब होणार नाही. त्यामुळे मेकेनिकची गरज नव्हती पण आयोजकांच्या प्रश्नांवर त्याच्याकडे दुसरे उत्तर होते. त्याने चार धातूच्या पायांवर उभा असलेला एक आरसा काढला आणि स्टिअरिंग व्हॅलीच्या मागे लावला. आता तो मागे न वळता इतर गाड्यांकडे पाहू शकत होता.
असा प्रकार लोक पहिल्यांदाच बघत होते. पण आता आयोजकांना शंका घेण्यात वाव नव्हता म्हणून त्याला रेस मध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळाली. तशी ७५ मैल वेगाने "रे हॉरोन"ने शर्यत पूर्ण केली. आणि दोन मैलाच्या अंतराने तो ही शर्यत जिंकला देखील. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात "मागे न वळता बघता येणाऱ्या" उपकरणाची चर्चा होती. (त्यावेळी "रिअर व्ह्यू मिरर" असे नामकरण झाले नव्हते !)
त्यानंतर खूप वर्षांनी "रे हॉरोनने एक गुपित सांगितले की रेसचा रस्ता खराब असल्याने त्याने लावलेला आरसा इतका हलत होता की त्याला काहीही बघताच आले नाही. पण रेस मधून बाहेर काढले जाऊ नये म्हणून तो तसाच कुणालाही न सांगता गाडी चालवतच राहिला. आरशाचा खरा उपयोग मागे वळून बघण्यासाठी नव्हताच . ..मेकॅनिक शिवाय रेस मध्ये भाग घेता यावा हाच आरशाचा उद्देश होता.
"रे हॉरोन" रेस का जिंकला माहितीये ? कारण त्याच्या गाडीत मेकॅनिक नसल्याने गाडीचे वजन आपोआप कमी झाले. त्यामुळे चाकांची झीज कमी झाली. इतरांना जिथे ८ -१ ० वेळा चाकं बदलावी लागली तिथे होरोनला केवळ चार वेळाच चाके बदलावी लागली. म्हणून तो शर्यत जिंकला.
आज कोणतीही गाडी "रिअर व्ह्यू मिरर" शिवाय पूर्णच होत नाही. आणि आज सर्व रेसिंग कार मध्ये फक्त एकच माणूस (ड्रायव्हर) बसेल इतकीच जागा असते !
सटीव्ह जॉब्ज म्हणतो तसं "प्रस्थापित नियम मोडणारेच जग बदलवणारं काम करतात !"
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !