टॉमी हिलफिगर: फॅशन जगतातील एक मार्केटिंग मास्टरस्ट्रोक

टॉमी हिलफिगर... हे नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल. हे नाव जरी आज जागतिक फॅशनमध्ये प्रतिष्ठित असलं तरी, ते नाव सुप्रसिद्ध कसं झालं यामागे एक जबरदस्त "मार्केटिंग" स्टोरी आहे !

तर मग काय घडलं ज्यामुळे टॉमी हिलफिगर नाव फॅशनच्या विश्वात झपाट्याने प्रसिद्ध झालं? याचं उत्तर आहे एका अफलातून मार्केटिंग स्टंटमध्ये, ज्यामागे होता एक प्रतिभावान माणूस - जॉर्ज लॉइस.
एका जाहिरातीमुळे जॉर्ज लॉइसने टॉमी हिलफिगरचं नशीब रातोरात बदलून टाकलं.

१९८५ चा काळ. टॉमी हिलफिगरला आपलं नाव फॅशन इंडस्ट्रीत मोठं करायचं होतं, पण तो एकदम अज्ञात होता. यासाठी त्याने जॉर्ज लॉइस या मार्केटिंग गुरूकडे मदत मागितली.टॉमीने जॉर्ज लॉईसला सांगितलं की त्याच्या ब्रँडला लोकप्रियता मिळायला हवी....आणि ती देखील कमीत कमी वेळात !

जॉर्ज लॉइसने एका भन्नाट आयडिया शोधून काढली. एवढी "अतरंगी" आयडिया की ती ऐकून ऐकून खुद्द टॉमही घाबरला. जॉर्जने प्रस्ताव दिला की टॉमीच्या नावाची तुलना फॅशनच्या दिग्गजांशी केली जावी:
राल्फ लॉरेन , कॅल्विन क्लेन, पेरी एलिस

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉम्युनिटी मध्ये सामील व्हा.
================

हे त्याकाळचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स होते. थेट त्यांच्यासोबत तुलना करायची अशी जॉर्ज लॉइसची संकल्पना होती.टॉमी हिलफिगर हे ऐकून चक्रावला.

"मी हे कसं करू शकतो? माझं असं म्हणणं म्हणजे मी स्वत:ची अवास्तव स्तुती करत असल्यासारखं वाटेल. हे लोक दिग्गज आहेत. मी त्यांच्यासमोर काहीच नाही."

जॉर्जने त्याला शांत बसवलं आणि म्हटलं, "जर तुला फॅशनमध्ये नाव कमवायचं असेल, तर तुला लाखो डॉलर जाहिरातींवर खर्च करायला लागतील आणि तरीसुद्ध तुझे नाव बनायला अनेक वर्षं लागतील.
पण जर तुला उद्या प्रसिद्ध व्हायचं असेल, तर आपल्याला काहीतरी भन्नाट करावं लागेल."

जॉर्जच्या कल्पनेनुसार एक जाहिरात तयार करण्यात आली.
त्यात तिन्ही जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर्सची नाव मधली काही अक्षरे गाळून लिहिण्यात आली आणि सोबत टॉमीचेही नाव तसेच लिहिण्यात आले. सोबत टॉमी हिलफिगरचा लोगो दिला होता. त्याखाली लिहिले होते ...जगातील चार सर्वत्कृष्ट फॅशन डिझायनर्सची नावे तुम्हाला ओळखता येतात का पहा ? आणि त्यापैकी सगळ्यात कमी प्रसिद्ध असलेल्या डिझायनरचा लोगो हा आहे !

न्यूयॉर्कमधल्या फॅशन साठी प्रसिद्ध असलेल्या 7th Avenue वर आणि इतर मोक्याच्या ठिकाणी या जाहिराती झळकल्या. एवढी bold जाहिरात पाहून लोक चकित झाले.
"हा टॉमी हिलफिगर कोण आहे? तो स्वत:ची तुलना राल्फ, पेरी, आणि कॅल्विनसारख्या दिग्गजांशी कसा करू शकतो?"

हिलफिगर अचानक प्रकाशझोतात आला. या जाहिरातीची इतकी चर्चा झाली की एका आठवड्यातच त्याला तेव्हाच्या प्रसिद्ध जॉनी कार्सन टीव्ही शोमध्ये पाहुणा म्हणून बोलावलं गेलं.

सुरुवातीला, टॉमी या सगळ्या प्रसिद्धीमुळे थोडा अस्वस्थ होता. पण आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
त्यामुळे त्याने मेहनत घेतली, नवनवीन डिझाइन्स साकारली, आणि हळूहळू जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून आपलं स्थान पक्कं केलं.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉम्युनिटी मध्ये सामील व्हा.
================


या यशातून शिकण्यासारखं काय?
धाडसी कल्पना लक्ष वेधून घेतात.
धाडसी कल्पना यशस्वी होतात (जर त्यामागे उत्कृष्ट उत्पादन असेल तर.)
भीतीमुळे अनेकदा चांगल्या कल्पना नाकारल्या जातात.

जॉर्ज लॉइसच्या धाडसी मार्केटिंगमुळेच टॉमी हिलफिगरचा प्रवास एका अज्ञात नावापासून जागतिक फॅशन आयकॉनपर्यंत झाला.

अर्थात इथे हे देखील नमूद करायला हवं की केवळ मार्केटिंग मुळे काही दिवस प्रकाशझोतात राहता येणे शक्य आहे मात्र दीर्घकाळ यश मिळवायचे असेल तर आपल्या उत्पादनात देखील तितकाच दम होता. प्रसिद्ध बॉक्सिंगपटू मोहम्मद अली पण स्वतःला I am the Best म्हणायचा. ते सतत म्हणण्यामुळे आपोआपच त्याची तशीच प्रतिमा तयार झाली. ही प्रतिमा टिकवण्यासाठी मोहम्मद अलीने प्रचंड मेहनत घेतली. नाव टिकवणे हेच त्याचं मोटिव्हेशन बनलं !

रोज सकाळी जागे झाल्यावर आणि रात्री झोपताना स्वतःशी म्हणून तर पहा...I am the Best ! I am the Best.....! स्वतःबद्दलच्या या सकारात्मक भावना दिवसेंदिवस बळकट होत जातात आणि पुढे तोच आपला स्वभाव बनत जातो !!

सलिल सुधाकर चौधरी