गुंतवणूक आणि सट्टेबाजी मधील फरक..? 

चला दोन्हीत तुलना करून पाहूयात ..(#Friday_Funda)

सट्टेबाजी किंवा गॅम्बलिंग म्हणजे काय?

एखाद्या खेळातील विजयाच्या अनिश्चिततेची संधी साधत विजय कोणाचा होईल हे ओळखण्यासाठी पैसे लावणे व उत्तर चुकताच ते पैसे हातून कायमचे गमावणे.. उदाहरणार्थ, पत्त्यांचा खेळ, डाईस किंवा लॉटरी .. जिथे उत्तर अनिश्चित असतं आणि संधी असंख्य असतात, आणि म्हणूनच संधी आणि नशीब यांचा जर मेळ बसला तर आणि तेव्हाच या खेळांमध्ये एखाद्याचं नशीब फळफळतं.. जुगारी माणूस म्हणूनच कायम याच आशेवर खेळत रहातो की आता या डावाला तरी माझं नशीब उघडेल.

गुंतवणूक म्हणजे काय?
गुंतवणूक म्हणजे पैसे देऊन शेअर्स खरेदी करणे किंवा एखादी मौल्यवान गोष्ट खरेदी करणे, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला भरपूर आर्थिक फायदा होईल किंवा फायदेशीर परतावा मिळेल. हे सगळं गुंतवणुकीच्या नियमांत बांधलेलं असतं म्हणूनच हे जुगारासारखं नाही. इथे भीती किंवा लोभ या दोन्हीला थारा नाही.लोभ आणि गुंतवणूक या दोन्हीत एक सूक्ष्म रेषा आहे आणि म्हणूनच जर एखाद्याने गुंतवणुकीचे सिद्धांत पाळले नाहीत, आणि केवळ अधिक पैसे मिळविण्याच्या दृष्टीने मार्केटचा गैरवापर करत गेला तर मात्र स्टॉक मार्केटमधली गुंतवणूक आणि जुगार यात काहीही फरक रहाणार नाही.

जुगार आणि गुंतवणूक यात फरक का आणि कसा आहे ?

- दोन्हीचं उद्दीष्ट सारखंच, जोखीम कमी करायची आणि भरपूर फायदा कमवायचा. स्टॉक मार्केटमधली गुंतवणूक ही संशोधनांती मिळालेल्या कठोर तथ्यांवर आणि माहिती (डेटा)वर पूर्णतः अवलंबून असते. गुंतवणुकीचं एक साधं तत्व, एकाच बास्केटमध्ये सगळी अंडी कधीच ठेऊ नका, या तत्त्वाने जुगार आणि ही गुंतवणूक यात प्रचंड मोठा फरक असल्याचं लक्षात येईल.

- एखाद्या जुगाराच्या अड्ड्यावर जितकं दीर्घकाळ खेळत रहालं, तितक्या वेळा तुम्ही तुमचं सगळं काही हारण्याच्या संधी स्वतःच निर्माण करत असता..आणि जिंकण्याची शक्यता केव्हाच हातून निघून गेलेली असते.म्हणूनच, जेव्हा आपण जिंकण्याची शक्यता कमी झाल्याचं दिसू लागतं, तेव्हाच थांबलं पाहिजे हे डोकं फार कमी जण तिथे चालवतात. ते खेळत रहातात, पुढे आणखी आणखी खेळतच रहातात, त्यांना वाटतं, कधी ना कधी ते जिंकतील पण तसं होत नाही.

मात्र हेच, स्टॉक मार्केटमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिलात तर एखाद्याला प्रचंड नफा होऊ शकतो. याचा अर्थ, दीर्घकाळपर्यंत शक्यता या गुंतवणूकदारांच्या हातात असतात. जितकी दीर्घकालची गुंतवणूक असेल तितका नफा जास्त मिळतो.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

- सट्टेबाजी किंवा जुगार हे फक्त संधीवर आणि नशीबावर अवलंबून आहे. जेव्हा खेळातले फासे फेकले जातात, चक्र फिरवली जातात तेव्हा त्याचं उत्तर काय येईल हे कोणाच्याही हातात नसतं, कोणालाच पुढे काय होईल हे माहिती नसतं. स्टॉक मार्केट मात्र गुंतवणुकीच्या दीर्घकालीन संशोधनांती मिळालेल्या तत्वांवर चालतं, तथ्यांवर चालतं.

- स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एखादी व्यक्ती त्याचा पूर्ण, नीट अभ्यास करू शकते. कंपन्यांचे बॅलन्सशीट अभ्यासणे, त्या कंपन्यांचा नफा व तोटा यांचा अभ्यास करणे, पूर्वीच्या ट्रेडींगचे पॅटर्न अभ्यासणे अशा प्रकारे सखोल अभ्यास करून मग गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकते. सट्टेबाजीमध्ये अशी कोणतीही माहिती कधीच मिळत नाही.

- गुंतवणूक म्हणजे अर्थकारणाला चालना देणारं इंजिनच आहे असे म्हणायला हरकत नाही.बाजारातील गुंतवणूक ही कंपन्यांना चालवण्यासाठी आवश्यक संसाधने प्रदान करते. कंपनीतील गुंतवणूकीतून केवळ आर्थिक नफा मिळणे एवढाच फायदा होत नाही, तर कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीमध्ये सहभागी होऊन समाजासाठीही भरीव योगदान देता येऊ शकते.

- एखादं निश्चित उद्दीष्ट मनात ठेऊन गुंतवणूक केली जाते, जसं की वृद्धापकाळासाठी पैसा जोडणे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करणे. गुंतवणुकीला निश्चित आणि योग्य असं कारण असतं. याउलट सट्टेबाजी ही केवळ मजा म्हणून केली जाते. त्यातून मिळणारा आनंद, त्यातला थरार हवाहवासा वाटतो म्हणून जुगार खेळला जातो. तसंच, या खेळातून होणारा तुटपुंजा फायदा निरर्थकच असतो, बरेचदा तर निव्वळ या खेळामध्ये वेळेचा अपव्यय आणि आर्थिक नुकसान दडलेले असते, ज्यामुळे खेळणाऱ्याचं आयुष्य वाया जातं. गुंतवणुक करताना थरार नसतो, गुंतवणुक ही समाधान देणारी असते.. जसं पेरलेलं बी हळूच मातीतून वर डोकं काढतं नि एक रोपटं जन्माला येतं.. जसं मातीवर गवत हळूहळू वाढतं .. तशी असते गुंतवणूक.. पण म्हणूनच गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घेणे, नीट अभ्यास करणे आणि नियमांमध्ये बसेल अशी योग्य गुंतवणूक करणे हेच आपल्या हातात आहे आणि तीच तर योग्य पद्धत आहे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीची .. !

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com