स्वतःचं घर – आता स्वप्न की वास्तव?

अमेरिकेत एक नवीन संकल्पना उदयास आली आहे — बूमरँग जनरेशन. म्हणजे असे तरुण जे एकदा स्वतंत्र होण्यासाठी घरातून बाहेर पडले होते, पण आर्थिक अडचणींमुळे पुन्हा आई-वडिलांकडे राहायला परतले. ही परिस्थिती अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे, आणि आता ती जगभरातील इतर देशांमध्येही पसरत आहे. अमेरिकेत जवळपास एक तृतीयांश (सुमारे 33%) तरुण पालकांकडे परत जात आहेत, कारण स्वतःचं घर घेणं किंवा भाड्याने राहणं त्यांना परवडत नाही. तज्ञांचा अंदाज आहे की ही संख्या लवकरच 50% पर्यंत पोहोचू शकते. या तरुणांना ‘बूमरँग’ जनरेशन म्हणतात, कारण ते बाहेर पडतात, स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, पण आर्थिक दबावामुळे पुन्हा पालकांकडे परत येतात — जसं बूमरँग मागे फिरून येतं.

या परिस्थितीमागील प्रमुख कारणं आहेत घरांच्या वाढत्या किंमती, मंद पगारवाढ, उच्च शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज आणि भाड्याचे वाढते दर. उदाहरणार्थ, अमेरिकेत गेल्या दशकात घरांच्या किमती सुमारे 40-50% नी वाढल्या आहेत, तर पगारवाढ सरासरी 10-15% च्या आसपास राहिली आहे. उच्च शिक्षणाचं कर्ज तरुणांवर प्रचंड ओझं बनलं आहे, आणि बरेचजण नोकरी मिळाल्यानंतरही स्वतंत्र राहण्यासाठी पुरेसं कमवू शकत नाहीत. परिणामी, पालकांकडे परत येणं हा त्यांच्यासाठी एकमेव परवडणारा पर्याय ठरतो.

ही परिस्थिती फक्त अमेरिकेपुरती मर्यादित नाही. भारतातही तरुणांना स्वतःचं घर घेऊन स्वतंत्र राहणं कठीण झालं आहे. विशेषतः मुंबई, दिल्ली, बेंगलुरूसारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती आणि भाडे इतके वाढले आहेत की सामान्य तरुणांना स्वतंत्र राहणं अशक्य वाटतं. उदाहरणार्थ, मुंबईत एका सामान्य 1 BHK फ्लॅटचं भाडं दरमहा 30,000 ते 50,000 रुपये आहे, आणि खरेदीसाठी किमती 1.5 कोटींपासून सुरू होतात. सरासरी तरुणाचा पगार (3-6 लाख वार्षिक) लक्षात घेता, 50-60% पगार EMI किंवा भाड्यात खर्च होणं अशक्य आहे.
Bloom Ventures Indus Valley Report नुसार, भारतीय कुटुंबं आपली 50-52% गुंतवणूक घर आणि जमिनीत, 15-18% सोन्यात, 15-16% बँक ठेवींमध्ये आणि फक्त 5% इक्विटी मार्केटमध्ये गुंतवतात. यावरून दिसतं की ‘स्वतःचं घर’ ही श्रीमंतीची आणि सामाजिक स्थैर्याची प्रमुख खूण मानली जाते. पण या श्रीमंतीच्या यादीत प्रवेश करणं आजकाल प्रचंड महाग झालं आहे.


1990 च्या दशकात, 2 लाख वार्षिक पगार असलेली व्यक्ती मुंबईत 15-20 लाखांत चांगलं घर घेऊ शकत होती, म्हणजे पगाराच्या 10 पट किंमतीत घर मिळत होतं. आज, 35 वर्षांनंतर, पगारात फक्त 2.5 पट वाढ झाली आहे (3-5 लाख वार्षिक), पण घरांच्या किमती 1.5 कोटींपर्यंत गेल्या आहेत, म्हणजे पगाराच्या 30 पट. यामुळे तरुणांसाठी स्वतःचं घर घेणं स्वप्नवत झालं आहे.
या परिस्थितीमागचं एक प्रमुख कारण म्हणजे Modern Monetary Theory (MMT), जी अमेरिकेतून सुरू झाली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अधिक चलन छापण्याचा हा कृत्रिम उपाय होता. यामुळे बाजारात पैसा वाढला, आणि हा पैसा घरं, जमीन, शेअर्स यासारख्या मर्यादित मालमत्तांमध्ये गुंतला. मागणी वाढली, पण पुरवठा मर्यादित असल्याने किमती झपाट्याने वाढल्या. घरं आणि जमिनीचा पुरवठा तात्काळ वाढवता येत नाही, त्यामुळे त्यांच्या किमती इतर ग्राहकोपयोगी वस्तूंपेक्षा जास्त वाढतात. याउलट, इतर वस्तूंचं उत्पादन वाढवणं शक्य असल्याने त्यांच्या किमती नियंत्रणात राहतात.

मग प्रश्न येतो: घर घ्यायचंच नाही का? YouTube आणि इतर प्लॅटफॉर्मवर घर खरेदी विरुद्ध भाड्याने राहण्याबाबत अनेक चर्चा होतात. Excel शीटमध्ये घर खरेदी चुकीचं वाटलं तरी स्वतःच्या घराचं भावनिक मूल्य, स्थैर्य आणि सुरक्षितता याकडे दुर्लक्ष करता येत नाही. यासाठी खालील तीन टप्प्यांची योजना उपयुक्त ठरू शकते:

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

1. Invest in Liquid Assets (25–30 वय): म्युच्युअल फंड, इंडेक्स ETF, आणि आपत्कालीन निधीमध्ये गुंतवणूक करा. यामुळे आर्थिक स्थैर्य मिळेल.
2. First Anchor (30–35 वय): उपनगरात किंवा मध्यम शहरात छोटं, परवडणारं घर घ्या, जिथे भाडं आणि EMI ची रक्कम जवळपास समान असेल.
3. Upgrade / Second Asset (40 नंतर): करिअर स्थिर झाल्यावर गरजेनुसार मोठं घर किंवा भाडे उत्पन्नासाठी दुसरं युनिट घ्या (पर्यायी).

तुमचं मत काय? घर भाड्याने घेणं योग्य वाटतं का, की स्वतःच्या मालकीचं घर हवं?
तुमचा दृष्टिकोन खाली कमेंटमध्ये शेअर करा आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, ज्यांना ‘घर घ्यावं का?’ हा प्रश्न सतावत आहे!


सलिल सुधाकर चौधरी,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!